3 ऑक्टोबरला मोठा नक्षलवादी हल्ला?
आपल्या दोन नेत्यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर देशव्यापी बंदची हाक देणारे नक्षलवादी तीन ऑक्टोबरला देशातील विविध सरकारी कार्यालयावर हल्ले करण्याची शक्यता असल्याने सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत. सीपीआय(माओवादी) चा नेता कोबाड गांधी आणि पश्चिम बंगालमधील लालगड नक्षली हल्ल्याचे नेतृत्त्व करणारा छत्रधर महतो याला पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्या अटकेविरोधात नक्षलवाद्यांनी हा बंद पुकारला आहे. नक्षलवादी अशा बंददरम्यान छोटे मोठे हल्ले करतात असा आतापर्यंतचा इतिहास होता. आता नक्षलवाद्यांनी छत्तीसगड, महाराष्ट्र, बिहार, झारखंड, ओरिसा यासह देशभरातील काही महत्त्वाच्या सरकारी कार्यालयांना लक्ष्य करण्याची योजना आखली असून, तीन ऑक्टोबर रोजी हे हल्ले होण्याची दाट शक्यता गुप्तहेर खात्याने वर्तवली आहे.