आदित्य L1 हे भारतीय यान आपल्या निर्धारीत जागी पोहोचलं आहे. भारतीय वेळेनुसार 6 जानेवारीला दुपारी चार वाजता आदित्य L1ला निर्धारीत कक्षेत पोहचवण्यात भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोला यश आलं आहे.
2 सप्टेंबर 2023 रोजी या यानानं श्रीहरीकोटा इथून उड्डाण केलं होतं. त्यानंतर 15 लाख किलोमीटरचा प्रवास करून हे यान पृथ्वी आणि सूर्यामधल्या लग्रांज पॉइंट वन पर्यंत पोहोचलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडिया साईट एक्सवरून त्याविषयी घोषणा केली. इस्रोनही तो ट्विट रीपोस्ट केला आहे.
लग्रांज पॉइंट वन हा सूर्य आणि पृथ्वीमधल्या अशा पाच बिंदूंपैकी एक आहे जिथे या दोन्हीचं गुरुत्वाकर्षण बल समसमान होतं आणि एखादं यान त्या भागात या लग्रांज पॉईंट्सभोवती कक्षेत फिरत ठेवता येतं.
या बिंदूपासून सूर्याचा कुठल्याही अडथळ्याविना अभ्यास आणि पृथ्वीशी सतत संपर्क या दोन्ही गोष्टी साध्य होता.
आदित्य L1 याच बिंदूभोवती कक्षेत राहून सूर्याचा अभ्यास करत आहे. नेमकं या यानानं आजवर काय साध्य केलं आहे?
सूर्याचे नयनरम्य फोटो
8 डिसेंबर 2023 ला इस्रोनं आदित्य L1 नं टिपलेला पहिला सूर्याचा पहिला पूर्ण फोटो शेअर केला.
आदित्य L1 वरील सोलार अल्ट्रा व्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप अर्थात सूट या उपकरणानं 6 डिसेंबर रोजी सूर्याकडून येणाऱ्या पहिल्या प्रकाशाची नोंद घेतली होती.
त्या वेळी 200 ते 400 नॅनोमीटरदरम्यान विविध तरंगलांबीवर घेण्यात आलेल्या नोंदींचे हे फोटो आहेत.
पुण्यातील आंतर विद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकशास्त्र केंद्र अर्थात आयुकाच्या सहयोगानं या सूटची निर्मिती करण्यात आली आहे.
सूर्याचा पृष्ठभाग आणि त्याजवळच्या वातावरणाचे तपशील यातून मिळत असल्याचं इस्रोनं तेव्हा म्हटलं होतं.
आदित्यचा सेल्फी आणि पृथ्वीचा फोटो
आदित्य L1चं 2 सप्टेंबरला प्रक्षेपण झाल्यानंतर लगेचच यानावरची काही उपकरणं काम करू लागली.
या यानानं टिपलेले दोन फोटो इस्रोनं शेअर केले होते.
पहिला फोटो पृथ्वी आणि चंद्राचा आहे. त्यात महाकाय पृथ्वीसमोर चंद्र एखाद्या ठिपक्यासारखा दिसतो.
तर दुसरा फोटो सेल्फी असून त्यात आदित्य L1 वरची दोन वैज्ञानिक उपकरणं दिसतात.
L1 बिंदूपर्यंतचा प्रवास
2 सप्टेंबरला भारताच्या पीएसएलव्ही रॉकेटनं आदित्य L1 यानाला घेऊन श्रीहरीकोटा इथून उड्डाण केलं होतं आणि हे यान पृथ्वीजवळ कक्षेत प्रक्षेपित केलं होतं.
इस्रोनं चार वेळा यानाची कक्षा वाढवत नेली आणि ऑक्टोबरला यानाच्या मार्गात थोडी सुधारणाही करण्यात आली. 30 सप्टेंबरला आदित्य L1 पृथ्वीच्या प्रभावक्षेत्रातून बाहेर पडलं.
चार महिन्यांनी ते लग्रांज पॉइंट वन जवळ पोहोचलं. 6 जानेवारीला हे यान लग्रांज बिंदूभोवती निर्धारीत कक्षेत प्रस्थापित करण्यात इस्रोला यश आलं.
त्यामुळे भारत हा बाह्य अंतराळात सौर मोहिमा आखणाऱ्या मोजक्या देशांमध्ये जाऊन पोहोचला आहे.
याआधी नासा, जपान आणि युरोपियन स्पेस एजन्सीने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी मोहिमा पाठवल्या होत्या. तर रशिया आणि चीननं सूर्याचा अभ्यास करणारे उपग्रह सोडले होते.
नासाचा सोलर पार्कर प्रोब तर चार वर्षांपासून सूर्याच्या पृष्ठभागाच्या सगळ्यात जवळ जाऊन संचार करत आहे. तो सोलर कोरोनाच्या आतही गेला आहे.
सूर्याविषयीच्या वैज्ञानिक कुतूहलाबरोबरच सूर्याकडून येणारा किरणोत्सार, सौर वादळं अशा गोष्टींचा पृथ्वीवर परिणाम होत असतो. संपर्कयंत्रणेसाठी महत्त्वाच्या कृत्रिम उपग्रहांवरही ही सौर वादळं प्रभाव टाकू शकतात. त्यामुळे त्यांचा अभ्यास ही गरजेची गोष्ट आहे.
Published By- Priya Dixit