शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 15 जून 2022 (11:49 IST)

आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर, असा आहे त्यांचा कार्यक्रम

महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आज (15 जून) अयोध्या दौऱ्यावर आहेत.
 
ते रामजन्मभूमीचं दर्शन घेतील तसंच संध्याकाळी शरयू नदीच्या किनाऱ्यावर आरती करणार आहेत. आदित्य ठाकरेंचा अयोध्येमध्ये दिवसभराचा कार्यक्रम आहे.
 
बुधवार (15 जून) सकाळी अकरा वाजता आदित्य ठाकरे हे लखनऊ एअरपोर्टवर पोहचतील. तिथून ते अयोध्येसाठी रवाना होतील.
 
दुपारी इस्कॉन मंदिराला भेट दिल्यानंतर ते पत्रकार परिषद घेतील. नंतर हनुमान गढी तसंच राम जन्मभूमीचं दर्शन घेतील. संध्याकाळी लक्ष्मण किलाला आदित्य भेट देतील. त्यानंतर शरयू किनाऱ्यावर आरती केल्यानंतर त्यांचा परतीचा प्रवास सुरू होईल.
 
आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा याआधी 10 जूनला निश्चित करण्यात आला होता. पण राज्यसभा निवडणुकीमुळे अयोध्या भेटीची तारीख बदलून 15 जून करण्यात आली.
 
दरम्यान, आदित्य यांच्या दौऱ्यासाठी शेकडो शिवसैनिक मुंबईहून उत्तर प्रदेशात दाखल झाले आहेत. शिवसेना नेते संजय राऊतही आदित्य यांच्या दौऱ्यासाठी अयोध्येत दाखल झाले आहेत. आदित्य ठाकरे जिथे जिथे जाणार आहेत, त्या-त्या भागांमध्ये जाऊन राऊत यांनी पाहणी केली.
 
आदित्य ठाकरेंप्रमाणेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही 5 जूनला अयोध्या दौरा करणार असल्याचं जाहीर केलं होतं.
 
मात्र भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध केला होता.
 
"उत्तर भारतीयांचा अपमान राज ठाकरे यांनी केला होता. त्यांनी माफी मागावी. ही संधी आहे त्यांच्यासाठी. आता त्यांनी माफी मागितली नाही तर पुन्हा उत्तर भारतात येऊ देणार नाही," असं ब्रिजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे. नंतर पायावर होणाऱ्या शस्त्रक्रियेमुळे राज यांनी आपला अयोध्या दौरा रद्द केला होता.
 
ब्रिजभूषण सिंह यांनी आदित्य ठाकरे यांचं मात्र स्वागत केलं आहे.