1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 सप्टेंबर 2023 (08:19 IST)

अनंतनाग हल्ला : मेजर आशिष गृहप्रवेशाला येणार होते, DSP हुमायूं 2 महिन्यांपूर्वी बाबा झाले होते

anantnag attack
Anantnag attack काश्मीरच्या अनंतनाग परिसरामध्ये कोकरनाग येथे भारतीय लष्कर आणि कट्टरतावाद्यांमध्ये चकमक झाली.
 
बुधवारी झालेल्या या चकमकीत कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धोंचक आणि डीएसपी हुमायूं मुजम्मिल भट्ट धारातिर्थी पडले.
 
या अधिकाऱ्यांशिवाय भारतीय सैन्यातील एक जवान देखील यामध्ये मरण पावला आहे.
 
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार या सैनिकाबाबत अद्याप फारशी माहिती मिळू शकलेली नाही.
 
बंदी असलेल्या रेजिस्टन्स फ्रंट नावाच्या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. असं म्हणतात की पाकिस्तानच्या लष्कर-ए-तय्यबा संघटनेची ही समातंर संघटना आहे.
 
पीटीआयने सांगितलेल्या माहितीनुसार, "अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की ही तीच दहशतवादी संघटना आहे जिने चार ऑगस्टला कुलगाममध्ये तैनात असणाऱ्या भारतीय सैन्यावर हल्ला करून तीन जवानांची हत्या केली होती."
 
या हल्ल्यानंतर सैन्याकडून हल्लेखोरांचा शोध सुरु असून, हल्लेखोरांना पकडण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली जात आहे.
 
काश्मीर पोलिसांनी सोशल मीडियावर या हल्ल्याची प्रतिक्रिया देतांना गुरुवारी लिहिलं होतं, "या मोहिमेदरम्यान सुरक्षादलांनी लष्कर-ए-तय्यबाच्या दोन दहशतवाद्यांना घेरलं असून, यामध्ये उजैर खान देखील आहे."
 
मागील काही वर्षांमध्ये झालेला हा सगळ्यांत मोठा हल्ला आहे.
 
अनंतनाग चकमकीत मारले गेलेल्या मेजर आशिष धोंचक, कर्नल मनप्रीत सिंग आणि पोलीस उपाधीक्षक हुमायूं भट्ट यांची ही गोष्ट.
 
कर्नल मनप्रीत सिंग : वडिलांनी ज्या तुकडीत नायक म्हणून काम केलं त्याच तुकडीत बनले कमांडिंग ऑफिसर
पंजाबमध्ये मोहालीजवळ मुल्लापूर नावाची जागा आहे आणि याच मुल्लापूरजवळ असणाऱ्या भरोजीया या गावात कर्नल मनप्रीत सिंग यांचं घर आहे.
 
भारतीय सैन्याच्या 19 राष्ट्रीय रायफल्समध्ये कर्नल मनप्रीत सिंग कमांडिंग ऑफिसर म्हणून काम करत होते. काही काळापूर्वीच कर्नल मनप्रीत यांना सैन्याने मेडल देऊन गौरविले होते.
 
सैन्याच्या ज्या तुकडीत मनप्रीत तैनात होते, त्याच तुकडीमध्ये त्यांचे वडील नायक म्हणून काम करत असत. कर्नल मनप्रीत यांना दोन भाऊ होते आणि काही काळापूर्वी त्यांच्या वडिलांचाही मृत्यू झाला होता.
 
अतिशय सामान्य कुटुंबात जन्मलेल्या कर्नल मनप्रीत यांची बायको आणि मुलं, त्यांच्या गावातल्या चंडी मंदिराजवळ राहतात.
 
कर्नल मनप्रीत यांच्या आई माध्यमांसोबत बोलताना म्हणाल्या की, "माझ्या मुलाला लहानपणापासूनच सैन्यात भरती व्हायचं होतं.
 
लहानपणी तो त्याच्या वडिलांचा गणवेश घालून बघत असे. दर शनिवार-रविवारी आम्ही फोनवरून बोलत असायचो. आम्ही त्याला मिस कॉल द्यायचो आणि त्याला वेळ मिळाला की तो आम्हाला परत कॉल करत असे."
 
"मी रोज बातम्या बघायचे पण त्यादिवशी मला बातम्या बघू दिल्या नाहीत. माझा मुलगा खूप कष्टाळू होता," हे सांगत असताना कर्नल मनप्रीत यांच्या आई रडत होत्या.
 
बीबीसी प्रतिनिधी सरबजीत सिंग यांच्या मते मनप्रीत सिंग यांच्या आई म्हणाल्या की, "माझ्या मुलाने पदोन्नती घेतली नसती तर कदाचित तो वाचला असता."
 
मनप्रीत यांचे नातेवाईक वीरेंद्र गिल यांनी एएनआयसोबत बोलताना सांगितलं की, "मी आणि मनप्रीत काल सकाळी आठ वाजता एकमेकांशी बोललो होतो.
 
त्यानंतर तो म्हणाला की तो नंतर बोलेल. तो खरोखर एक चांगला माणूस होता. मागच्या वर्षीच सैन्याने पदक देऊन त्याचा गौरव केला होता.
 
बुधवारी दुपारी अडीच वाजता आम्हाला तो जखमी झाल्याचा फोन आला. त्यानंतर आम्ही मनप्रीतच्या पत्नीला हा प्रकार सांगितला."
 
कर्नल मनप्रीत सिंग यांचे सासरे जगदेव सिंग म्हणाले की, "तीन वर्षांपूर्वीच मनप्रीत यांना पदोन्नती मिळाली होती. त्यांना सहा वर्षांची बानी आणि दोन वर्षांचा कबीर अशी दोन मुलं आहेत."
 
माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार मनप्रीत यांच्यावर पंचकुला येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.
 
मेजर आशिष धोंचक : गृहप्रवेशासाठी घरी येणार होते, पण...
सैन्याच्या 15 शीख एल आय तुकडीत मेजर आशिष धोंचक काम करत होते.
 
बीबीसीचे सहयोगी पत्रकार सत सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेजर आशिष धोंचक हे हरियाणातील पानिपतजवळ असणाऱ्या बिंझौल गावचे रहिवासी होते.
 
पुढच्या महिन्यात मेजर आशिष त्यांच्या घरी येणार होते. त्यांच्या गावी त्यांनी नवीन घर बांधलं होतं आणि तिथे गृहप्रवेशाची पूजा करण्यासाठी ते गावी येणार होते.
 
मेजर आशिष यांचे वडील लालचंद हे एका खताच्या कंपनीत काम करायचे आणि निवृत्तीनंतर कुटुंबासोबत भाड्याच्या घरात राहत होते.
 
काश्मीरमध्ये नियुक्त होण्यापूर्वी मेजर आशिष हे उत्तर प्रदेशातील मेरठ येथे तैनात होते. दोनच वर्षांपूर्वी ते जम्मूला गेले होते.
 
मेजर आशिष दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झाल्याची बातमी मिळाल्यानंतर त्यांचे काका माध्यमांशी बोलताना म्हणाले की, तीन दिवसांपूर्वीच फोनवर त्यांचं बोलणं झालं होतं. 13 ऑक्टोबरला गृहप्रवेशाच्या पूजेसाठी ते घरी परत येणार होते.
 
मेजर आशिष यांच्या कुटुंबात आई-वडील, पत्नी, दोन वर्षांची मुलगी आणि तीन बहिणी आहेत.
 
पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना मेजर आशिष यांचे आजोबा म्हणाले की, "आम्हाला रात्री नऊ वाजता आशिष शहीद झाल्याची बातमी मिळाली. खूप दुःख झालं. देशासाठी आमच्या मुलाने बलिदान दिलं. आशिष खूपच हुशार होता."
 
मेजर आशिष धोंचक यांचे काका दिलावर सिंग म्हणाले की, "त्याच्या आई वडिलांचा तो एकुलता एक मुलगा होता. त्याला तीन बहिणी होत्या.
 
एकच महिन्यापूर्वी तो घरी आला होता आणि आता फोनवरून त्याच्या मृत्यूची बातमी मिळाली. पहिल्यांदा कळलं की तिथे एक ऑपरेशन सुरु आहे मात्र नंतर बातम्यांमधून तो गेल्याचं कळलं."
 
डीएसपी हुमायूं मुजम्मिल भट्ट : दोनच महिन्यांपूर्वी बाबा झाले होते, पण...
जम्मू काश्मीर पोलीस दलात डीएसपी म्हणून काम करणारे हुमायूं मुजम्मिल भट्ट यांना दोनच महिन्यांची मुलगी आहे.
 
हुमायूं यांचे वडील गुलाम हसन भट्ट हे जम्मू काश्मीर पोलीस दलामध्ये पोलीस महानिरीक्षक म्हणून काम करत होते. 2018 मध्ये ते निवृत्त झाले होते.
 
चकमकीत मारल्या गेलेल्या मुलाला सलामी देतानाचा त्यांचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे.
 
ग्रेटर काश्मीरच्या रिपोर्टनुसार, हुमायूं भट्ट हे 2018 च्या जेकेएस तुकडीचे अधिकारी होते, दीड वर्षांपूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं. दोनच महिन्यांपूर्वी त्यांच्या मुलीचा जन्म झाला होता आणि हुमायूं बाबा बनले होते.