मंगळवार, 17 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 21 ऑक्टोबर 2023 (13:31 IST)

रक्ताचा एक थेंबही न सांडता हृदय प्रत्यारोपण, भारतीय डॉक्टरांचा मोठा चमत्कार

अशियामध्ये पहिल्यांदाच डॉक्टरांनी असे काही केले आहे ज्याची कोणालाही अपेक्षा नव्हती. अहमदाबादमध्ये करण्यात आलेले हृदय प्रत्यारोपण रक्ताचा एक थेंबही न सांडता यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. एवढेच नाही तर रूग्णाला हॉस्पिटलमध्ये केवळ 9 दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आणि डिस्चार्ज देण्यात आला, तर सामान्य केसेसमध्ये 25 दिवसांचा कालावधी लागतो.
 
अहमदाबादचे डॉ. राजीव सिंघल यांनी सांगितले की, 52 वर्षीय रुग्ण चंद्रप्रकाश गर्ग यांना हृदय प्रत्यारोपणाची नितांत गरज होती. त्यामुळे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे हृदय गर्ग यांच्या शरीरात रोपण करण्यात आले. या प्रत्यारोपणाच्या माध्यमातून मृत व्यक्तीच्या हृदयाला नवे शरीर मिळाले आणि ज्या व्यक्तीला जिवंत राहण्यासाठी हृदयाची गरज होती त्या व्यक्तीला नवीन जीवन, नवीन हृदय मिळाले.
 
डॉक्टर धीरेन शहा आणि धवल नाईक यांच्या टीमने हे यशस्वी प्रत्यारोपण पूर्ण करून रुग्ण चंद्रप्रकाश गर्ग यांनाही नवजीवन दिले.
 
सामान्य हृदय प्रत्यारोपणाची किंमत आणि या नवीन तंत्राने केले जाणारे उपचार समान आहे. या नवीन तंत्रज्ञानामध्ये इतर कोणत्याही व्यक्तीकडून रक्त देण्याची गरज नाही. दुसऱ्याचे रक्त घेतल्याने रुग्णाचा मृत्यू होण्याचा धोका वाढतो आणि इतकेच नाही तर त्याला दीर्घकाळ रुग्णालयात राहावे लागते.
 
भारतात रक्ताचा तुटवडा सुमारे 20 लाख आहे. अशा परिस्थितीत या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपण लाखो लोकांचे प्राण वाचवू शकतो. त्याचबरोबर भारतात अवयवदानाबाबत लोकांना जागरूक करण्याचीही गरज आहे. भारतात अवयवदानाचे प्रमाण केवळ 1% आहे, तर अमेरिकेत ते 30% आहे. त्यामुळे भारतात हा दर वाढवण्याची गरज आहे, जेणेकरून अधिकाधिक लोकांचे प्राण वाचवता येतील.