गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 30 जून 2022 (11:05 IST)

उदयपूर हत्या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री गेहलोत यांचा दौरा

राजस्थानमध्ये टेलर कन्हैय्यालाल साहू यांच्या हत्येनंतर येथील वातावरण तणावपूर्ण आहे.
 
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अशोक गहलोत उदयपूर येथे भेट देऊन येथील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
 
यावेळी गहलोत यांच्यासोबत गृह राज्यमंत्री राजेंद्र यादव, पोलीस महासंचालक एम. एल. लाठर आणि इतर वरिष्ठ अधिकारी असणार आहेत.
 
काल मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एक सर्वपक्षीय बैठक झाली. यानंतर मुख्यमंत्री गहलोत यांचा उदयपूर दौरा निश्चित झाला.
 
कन्हैय्यालाल साहू यांच्या हत्येची घटना मंगळवारी दुपारी घडली होती. दोघांनी गळा चिरून कन्हैय्यालाल यांची हत्या केली.
 
राजस्थान पोलीस महासंचालक एम. एल. लाठर यांनी बीबीसीशी फोनवर संवाद साधताना म्हटलं, "आतापर्यंत दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. शिवाय बुधवारी इतर चार जणांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे."
 
मोहम्मद रियाज आणि गौस मोहम्मद अशी पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत.
 
या हत्या प्रकरणाचा तपास आता NIA कडे सोपवण्यात आला आहे. घटनेच्या दिवशीच NIA चं पथक उदयपूरला दाखल झालं होतं.
 
याव्यतिरिक्त राज्य सरकारने गठित केलेली SIT आणि ATS सुद्धा तपासामध्ये NIA ला सहकार्य करेल.
 
दुसरीकडे, जयपूरमध्ये आज बंद पाळण्यात येणार आहे. हिंदू संघटनांनी हा बंद पाळण्याचं आवाहन केलं आहे. हिंदू संघटनांकडून रविवारी (3 जुलै) कन्हैय्यालाल यांच्या हत्येच्या विरोधात मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरण्यासंदर्भात तयारी सुरू आहे.
 
या मोर्चामध्ये अंदाजे एक लाख लोक सहभागी होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
उदयपूर दौऱ्यावर जाण्यापूर्वी अशोक गहलोत यांनी सर्व धर्मगुरू, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि समाजसेवकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं.
 
शिवाय, समाजात भीती आणि अस्थिरतेचं वातावरण निर्माण होईल, असा कोणताही मजकूर सोशल मीडियावर शेअर करण्यात येऊ नये, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
 
हत्येनंतर राजस्थानातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. उदयपूरमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे.