1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2024
  3. लोकसभा निवडणूक 2024 बातम्या
Written By
Last Updated : मंगळवार, 25 जून 2024 (14:20 IST)

ओम बिर्ला विरुद्ध के. सुरेश: लोकसभा अध्यक्षांची निवड कशी होते?

हिमाचल प्रदेशातल्या सिरमौर जिल्ह्यातील नाहानमध्ये कथित गोहत्येवरून हिंसक निदर्शने झाली, त्यानंतर मुस्लिम समाजाच्या काही लोकांची दुकानं फोडण्यात आली. आता शनिवारी(22 जून) पोलीस तपासात गोहत्येसारखी घटना घडलीच नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
 
काय आहे संपूर्ण प्रकरण?
खरं तर, हिमाचल प्रदेशच्या सिरमौर जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या नाहानमध्ये बुधवारी (19 जून) आंदोलकांच्या जमावाने मुस्लिम समाजातील लोकांच्या चार दुकानांची तोडफोड करून गोंधळ घातला.
 
कथित गोहत्येच्या घटनेमुळे जमावाने संतप्त होऊन 'जय श्री राम'च्या घोषणा दिलाय. या प्रकरणाने सोशल मीडियावरही बरंच लक्ष वेधून घेतलं होतं.
 
बुधवारी (19 जून) झालेल्या गदारोळानंतर तीन दिवसांपर्यंत याप्रकरणी कोणतीही ठोस माहिती मिळालेली नव्हती. स्थानिक पोलिसही उत्तर प्रदेश पोलिसांच्या अहवालाची वाट पाहत होते.
 
बीबीसी हिंदीशी बोलताना उत्तर प्रदेश पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, "पोलीस कर्मचारी जावेदच्या घरी गेले आणि त्यांनी आजूबाजूला चौकशीही केली. घटनास्थळी गोहत्येसारखी कोणतीही घटना घडल्याचं आढळून आलं नाही."
 
उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यातील जावेद हा तरुण गेल्या 10 वर्षांपासून नाहानमध्ये रेडिमेड कपड्यांचा व्यवसाय करत होता. ईदनिमित्त तो शामलीमध्ये असणाऱ्या त्याच्या घरी गेला होता.
 
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईदच्या दिवशी जावेदने आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर कुर्बानीचा फोटो अपलोड केला होता. हा फोटो नाहानच्या हिंदू संघटनेशी संबंधित काही लोकांनी बघितला.
 
जावेदने गोहत्येनंतर बहुसंख्यक समाजाला दुखावण्यासाठी हा फोटो मुद्दाम अपलोड केल्याचा समज, या लोकांनी करून घेतला.
 
ज्या दिवशी हा फोटो अपलोड करण्यात आला होता, त्यादिवशी या नाहानमध्ये कसलाही गोंधळ झाला नव्हता मात्र काही हिंदू संघटनांकडून कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती.
 
या संघटनांनी गेल्या बुधवारी बाजार बंदच आवाहन केलं होतं. दरम्यान, बडा चौक बाजारपेठेत व्यापारी मंडळाच्या लोकांसह हिंदू संघटनांच्या काही लोकांनीही एक मोर्चा काढला होत. यावेळी शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
 
या मोर्चाबद्दल बोलताना स्थानिक लोक सांगतात की जसजसा हा मोर्चा राणी तालाकडे सरकला तसतसा तो मोर्चा अधिक आक्रमक होत गेला.
 
जावेद आणि त्याच्या नातेवाईकांच्या दुकानाजवळ आल्यावर या मोर्चात सहभागी झालेल्या काही लोकांनी दुकानाची तोडफोड सुरु केली.
 
काही वेळातच या संतप्त लोकांनी दुकानातला माल बाहेर फेकण्यास सुरुवात केली. त्यांनी बराच माल लुटून नेला. पोलिसांचा फौजफाटा तिथे उपस्थित होता पण त्यांना एवढ्या गर्दीवर नियंत्रण मिळवता आलं नाही. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.
 
पण मुळात ज्या फोटोवरून हे सगळं नाहानमध्ये घडत होतं त्या फोटोतील कुर्बानी ही नाहानमध्ये नाही तर शामलीमध्ये देण्यात आली होती.
 
बुधवारी ही घटना घडल्यानंतर झालेल्या प्राथमिक तपासताच तो फोटो नाहानचा नसल्याचं उघड झालं होतं. पण हे कळेपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं, एव्हाना नाहानमध्ये गोहत्या झाल्याची अफवा तिथे वाऱ्यासारखी पसरली होती आणि याचा परिणाम म्हणून आक्रमक झालेल्या जमावाने काही निवडक दुकानांची तोडफोड केली.
 
एका अफवेमुळे संपूर्ण शहर पेटलं
बुधवारी सायंकाळपर्यंत हिंदू संघटनांचं आंदोलन तर शांत झालं पण, त्या शहरातल्या मुस्लिम धर्मीयांमध्ये भीतीसोबतच आक्रोश पसरला. नाहानमधील मुस्लिम समुदाय विचारत होता की या जमावाने एवढी मोठी हिंसक घटना का घडवली?
 
नाहान येथील प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ प्राध्यापक अमरसिंह चौहान म्हणतात की एका अफवेमुळे एवढं सगळं घडलं, यापेक्षा गंभीर घटनाही घडू शकल्या असत्या.
 
अमरसिंह चौहान म्हणतात की, “एवढी असहिष्णुता समाजासाठी चांगली नाही. सुसंस्कृत समाजात संयम असणं गरजेचं आहे. आता तुम्हीच बघा, या आंदोलनाचा उद्देश पोलिसांवर कायदेशीर कारवाईसाठी दबाव टाकण्याचा होता, आंदोलनात सहभागी लोकांनी कायदा मोडला. अशा मॉब सिस्टमचा कोणालाच फायदा होत नाही. प्रत्येकाला, धर्माचा विचार न करता, सभ्यता दाखवली पाहिजे."
 
या घटनेने नाहानमधील सौहार्दच बिघडला नाही तर देवभूमी(हिमाचल प्रदेश)चे नावही कलंकित झाल्याची खंत अमरसिंह चौहान यांनी व्यक्त केली. ज्यांचं नुकसान झालं, ज्यांना व्यवसाय बंद करावे लागले त्यांची भरपाई कोण देणार असा सवाल अमरसिंह चौहान विचारतात.
 
अंजुमन इस्लामिया संघटनेचे अध्यक्ष बॉबी अहमद म्हणतात की, "गोहत्येसारखी कोणतीही घटना घडली नसल्याचं स्वतः पोलिसांनीच आता सांगितलं आहे. मात्र, लोकांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागल्याचं ते मान्य करतात."
 
बॉबी अहमद म्हणाले की, “नाहानमध्ये ही घटना घडल्यानंतर मुस्लिम समुदायातील किमान 16 लोकांनी हे शहर सोडले आहे. काहींनी भीतीपोटी तर काहीजणांना दुकानमालकांनी जागा रिकामी करायला सांगितल्यामुळे शहर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. शहर सोडून गेलेले हे सगळे लोक उत्तर प्रदेशातील शामली आणि सहारनपूरचे रहिवासी आहेत."
 
नुकसान भरपाई कोण देणार?
या दंगलीत ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना नुकसानभरपाई कोण देणार? या प्रश्नाचं उत्तर सध्या कुणाकडेही नाही. नाव न सांगण्याच्या अटीवर हिमाचल प्रदेश सरकारच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, "दोन्ही बाजूंनी चुका झाल्या आहेत. भावना दुखावणारा तो फोटो अपलोड करण्याची गरज नव्हती. तसेच बहुसंख्य समाजातील लोकांनी थोडं समजुतीने वागायला हवं होतं. जर समजा गोहत्या झालीच असती तर जावेद आणि त्याच्या विरोधकांमध्ये काय फरक उरला असता?.
 
आता जिथपर्यंत नुकसानभरपाईबद्दल विचारलं जातंय तर त्यात दोन प्रमुख अडचणी आहेत. पहिली अडचण म्हणजे मालमत्तेचं जे नुकसान झालं आहे ते कोण भरून काढणार आणि दुसरी समस्या म्हणजे जो सामाजिक सलोखा बिघडला आहे तो पूर्ववत कसा होईल?"
 
यावर उत्तर देताना नाहान येथे राहणारे 83 वर्षीय प्राध्यापक सुरेश कुमार जोशी म्हणतात की, "अशा घटना खूप दुखावणाऱ्या आहेत. देवभूमीत अशा घटनांना जागा नाही. एका अफवेमुळे किती नुकसान झाले आहे ते तुम्ही बघा. काही वर्षांपासून समाजात असं वातावरण निर्माण झालं आहे की, लोक छोट्या छोट्या गोष्टींसाठी आक्रमक होतात. अशा परिस्थितीत आपण संयम बाळगला पाहिजे."
 
"मी एवढंच म्हणेन की देव सर्वांना सद्बुद्धी देओ. आता जबाबदारी सरकारची आहे. या घटनेत चूक कुणाची का असेना त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. जे काही नुकसान झालं त्याची नुकसानभरपाई मिळाली पाहिजे आणि ज्यांनी नुकसान केलं त्यांना शिक्षा केली पाहिजे."
 
या संपूर्ण प्रकरणावर सिरमौरचे पोलीस काय म्हणाले?
सिरमौर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक रमण कुमार मीना म्हणाले की, "जावेदच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दंगलीसाठी जमावाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच दोषींची ओळख पटवली जाईल."
 
ते म्हणाले की, "उत्तर प्रदेश पोलिसांचे वक्तव्य पाहिले आहे, अधिकृत उत्तर आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. पोलिसांनी या घटनेला हिंसक वळण लागू दिले नाही."
 
पोलिसांच्या उपस्थितीत आरोपीच्या दुकानाची तोडफोड झाली का? या प्रश्नाला उत्तर देताना पोलीस अधीक्षक रमण कुमार मीणा म्हणाले की, "हे सर्व अचानक घडलं. तरीही पोलिसांनी या घटनेवर नियंत्रण आणलं. सोशल मीडियावर एक छोटीशी क्लिप व्हायरल झाली. मात्र पोलिसांनी अत्यंत समजूतदारपणाने कारवाई केली आहे" तरीही कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा निदर्शनास आल्यास कारवाई केली जाईल."
 
ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांची भरपाई कोण करणार? या प्रश्नाच्या उत्तरात मीना सांगतात की, "पोलिस कायद्यानुसार काम करतील. आंदोलकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून दुकानाची तोडफोड करणाऱ्यांचा आणि दुकानात लूटमार करणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत." उत्तर प्रदेश पोलिसांनी गोहत्या झाली नसल्याचं सांगितलं

शामलीचे पोलीस अधीक्षक अभिषेक म्हणाले की, "तपासात असं आढळून आलं आहे की, बंदी असलेल्या कोणत्याही पशुची कत्तल करण्यात आलेली नाही. परंतु ज्या प्रकारे हा फोटो अपलोड करण्यात आला आहे, त्याची नोंद घेऊन आरोपीविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत." जावेदला धार्मिक भावना भडकावल्याच्या आरोपाखाली शामली पोलिसांनी शनिवारी (22 जून) अटक केली आहे.
 
मात्र, नाहान येथील बडा चौकात जगन्नाथ मंदिराजवळ एक छोटं दुकान चालवणाऱ्या वृद्ध व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, "त्या दिवशी जे काही घडलं ते चांगलं नव्हतं. मी जावेदला ओळखतो, पण जेव्हा त्याने असं काहीतरी केल्याचं मी ऐकलं तेव्हा वाईट वाटलं. आता लोक म्हणत आहेत की ती गाय नव्हती, ते वेगळं काहीतरी होतं. त्याने जो फोटो अपलोड केला होता तो फोटो सगळ्यांना दाखवण्यासारखा नव्हता. पण आमच्या लोकांनी जो प्रकार केला तोही चुकीचाच होता."
 
तसेच ते हेही म्हणाले की, "जावेदने हा फोटो कुठे काढला हे कुणालाच कळलं नाही? तसेच जो प्राणी कापताना तो फोटो काढला आहे तो प्राणी कोणता आहे हेही कळू शकलं नाही. गोहत्येची गोष्ट लोकांच्या कानावर पडली आणि लोकांनी गोंधळ करायला सुरुवात केली."
 
हे सांगताना संबंधित व्यक्तीने सांगितलं की, "आमची ओळख गुप्त ठेवा, मी म्हातारा आहे, आता या वयात मी कुणाकुणासोबत लढत फिरू"
 
या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी नाहान शहरात शांतता असली तरी मुस्लिम समाजातील लोकांमध्ये एक विचित्र भीती दिसून आली. यातील काही लोक जावेदवर नाराजही होते, पण ‘मॉब जस्टिस’ची भीती स्पष्टपणे दिसून येत होती. या घटनेनंतर नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
 
मुस्लिम समुदायात भीती पसरली आहे
आम्ही या घटनेबाबत जावेदचे चुलत भाऊ साबिज यांच्याशी फोनवरून बोललो. साबिज म्हणाले की, "ही संपूर्ण घटना एका अफवेमुळे घडली. प्रत्येकजण म्हणतोय की गोहत्या झाली, पण सगळ्यांना ती गोहत्याच आहे हे कसं कळलं?आता पोलिसांनीही असं काही घडलं नसल्याचं सांगितलं आहे.
 
एक फोटो बघून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी ही गोहत्या असल्याचं म्हटलं. त्यांनी एवढा मोठा निषेध मोर्चा काढला. आमच्या दुकानांची तोडफोड केली, काही लोकांनी तिथे लूटमार केली.
 
नेमका आमचा गुन्हा काय होता? समजा जावेदने काही चुकीचं केलंच असेल तरी या लोकांचं असं वागणं बरोबर होतं का? या हल्ल्यानंतर मी मोठ्या मुश्किलीने माझ्या कुटुंबाला घेऊन नाहानमधून पळून आलो आहे."
 
आता शामलीहून नाहानला परत जाणार का? या प्रश्नाला उत्तर देताना सबिज म्हणाले की, "या घटनेनंतर घरमालकाने आम्हाला दुकान रिकामे करण्यास सांगितले आहे. काही लोकांना आता आम्हाला तिथे(नहान) राहू द्यायचं नाहीये. याच लोकांनी आमच्या दुकानमालकांवर आम्हाला दुकान देऊ नये यासाठी दबाव टाकला आहे. आमचे मालक चांगले आहेत पण लोकांच्या दबावामुळे त्यांचा नाईलाज आहे."
 
साबिज आणि इतर काहींनी सुरुवातीला गोहत्या झाली नसल्याचा दावा केला होता. उत्तर प्रदेश पोलिसांचा अहवाल आल्यानंतर सिरमौर पोलिसांनी हे प्रकरण जाणून घेण्यासाठी सुरु केलेला तपासही आता थांबला आहे.
 
मात्र, गुरुवारी (20 जून) पुन्हा आंदोलन होऊ शकते, या भीतीने काही मुस्लिम दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. जावेदच्या दुकानाजवळ कपड्यांचे दुकान असलेल्या इम्रानने त्या दिवसापासून दुकान बंद केलं होतं.
 
इम्रान यांनी शुक्रवारी (21 जून) पुन्हा दुकान सुरु केलं. कपड्यांचे बंडल उघडताना इम्रान म्हणतात की, "त्या दिवशी बाजार बंद होता, अन्यथा, गर्दीचा राग पाहता आणखी नुकसान होऊ शकलं असतं."
 
ज्या ठिकाणी हा गोंधळ झाला त्याच्या शेजारील गार्गी गल्लीतील प्लंबर इरफान अहमद फोनवर कोणाशी तरी बोलत होते आणि आता तिथे परिस्थिती सामान्य असल्याचं सांगत होते.
 
इरफान म्हणाले की, "मी दोन दिवस कामावर गेलो नाही. आमचे इतर लोकही त्यांच्या घरीच थांबले होते. बुधवारी आम्हाला कळले की जावेद, त्याचा चुलत भाऊ सबिज आणि इतर दोघांच्या दुकानांची तोडफोड करण्यात आली आहे. आम्ही आमच्या आजोबांच्या पिढीपासून इथे राहतो आहोत, तेव्हापासून आजपर्यंत इथे असं काहीही घडलं नव्हतं."
 
गुरुवारी सायंकाळी उशिरा शहराच्या मध्यभागी असलेल्या दर्ग्यात अंजुमन इस्लामिया संघटनेचे बॉबी अहमद दिवसभरात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीबाबत आपल्या सहकाऱ्यांसोबत चर्चा करत होते.
 
बॉबी म्हणाले की, "या संपूर्ण घटनेतून कोणालाही काहीही मिळाले नाही, फक्त गरीब लोकांचेच नुकसान झाले, मग ते कोणत्याही धर्माचे असोत. बाजार बंद राहिला तर सगळ्यांचंच नुकसान झालं. जी तोडफोड झाली आणि मुस्लिम समाजाला उद्देशून जे काही बोललं गेलं ते पाहता बिघडलेली सामाजिक घडी पुन्हा व्यवस्थित होण्यासाठी खूप वेळ लागेल. हे नुकसान भरून काढणं खूप अवघड आहे."
 
बॉबी अहमद म्हणाले की, "जर कोणी काही चुकीचे केले असेल तर त्याला त्याची शिक्षा नक्कीच झाली पाहिजे. जर गोहत्या झाली असेल तर त्याला शिक्षा व्हायला हवी, पण शिक्षा कोण ठरवणार? शिक्षा करण्याचा अधिकार तुम्हाला किंवा मला नाही. अशा प्रकारे ही एक चुकीची प्रथा सुरू होईल जी खूप गंभीर आहे, जर तुम्ही उद्या काही चूक केली तर मी तुमच्या घराची तोडफोड करू शकतो का?"
 
हिमाचलमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या किती आहे?
2011 च्या जनगणनेनुसार, हिमाचल प्रदेशात एकूण 1 लाख 50 हजार मुस्लिम समुदायाचे लोक राहतात. एकूण लोकसंख्येच्या 2.18 लोकसंख्या ही मुस्लिम समुदायाची आहे. सिरमौर जिल्ह्यात सुमारे 30 हजार मुस्लिम राहतात.
 
नाहानमध्ये राहणारे रफिक सांगतात की, "आम्हाला नेहमी कारवाईचं, नुकसानभरपाईचं आश्वासन दिलं जातं पण काहीही होत नाही. याही प्रकरणात खरंच कारवाई होईल का? आमचा दोन-तीन दिवसांचा रोजगार गेला. आमच्या समाजाविरुद्ध जे वातावरण तयार झालं त्याचं नुकसान आमच्यासारख्या गरिबांनाच सोसावं लागणार आहे. आता मला सांगा त्याची भरपाई कोण करेल?"
 
शुक्रवारी सकाळी शहरात विविध ठिकाणी योग दिन साजरा करण्यात आला. गेल्या काही दिवसांमध्ये तिथे जणू काही घडलंच नाही असं वातावरण होतं, रस्त्यावर लोक नेहमीप्रमाणे दैनंदिन कामात व्यस्त होते.
 
नाहानच्या गुन्नू घाट भागात राहणारे अशफाक खान या सगळ्यामागे आणखी काही कारणं असू शकतात असं म्हणतात.
 
अशफाक म्हणाले की, "कुणीही जर असा फोटो बघितला तर त्याच्या धार्मिक भावना नक्कीच दुखावल्या जाऊ शकतात. परंतु, संपूर्ण माहिती न घेता कायदा हातात घेण्यामागे इतरही काही कारणं आहेत. गेल्या काही वर्षांत जे लोक उत्तर प्रदेशच्या शामली, सहारनपूर, मुरादाबाद आणि इतर काही जिल्ह्यांतून इथे आले आहेत, त्यांच्यावर स्थानिक व्यापारी खुश नाहीयेत. स्थानिकांना जेंव्हा संधी मिळेल तेंव्हा ते या लोकांना परतवण्याची संधी शोधत असतात."
 
गुरुवारी, सिरमौरचे जिल्हा दंडाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांनी 'शांतता समिती'ची बैठक बोलावली होती ज्यामध्ये सगळ्यांची मत ऐकण्यात आली.
 
एका अधिकाऱ्याने सांगितलं की या बैठकीत काही लोकांनी सहारनपूर आणि इतर जिल्ह्यांमधून आलेल्या लोकांना परत पाठवण्याबाबत चर्चा केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की, हे कायदेशीर नाही आणि कोणाला काही अडचण किंवा शंका असल्यास त्या व्यक्तीला घर भाड्याने देऊ नका. बाहेरून आलेले व्यापारी स्थानिक व्यापाऱ्यांसोबत स्पर्धा करत आहे नाहानमधल्या गुन्नू घाटापासून ते बड्या चौकापर्यंत लोक या प्रकरणाची चर्चा करत होते.
 
टेलरिंग करणाऱ्या मोहम्मद उस्मान यांना वाटतं की स्थानिक शिंप्यांपेक्षा कमी दरात चांगली सेवा ते देतात आणि म्हणून त्यांच्यावर काहीजण नाखूष आहेत पण ग्राहक मात्र त्यांच्या कामावर समाधानी आहेत. आता अचानक अशा गोष्टी घडत आहेत ज्या योग्य नाहीत.
 
उस्मान म्हणतात की, "व्यवसायात स्पर्धा असते पण त्याला अशा प्रकारे धोकादायक बनवणे पूर्णपणे चुकीचे आहे. तुम्हीच मला सांगा, या सगळ्याचा आमच्या मुलांवर काय परिणाम होईल?"
 
गुन्नू घाट परिसरात राहणाऱ्या अमीना म्हणतात की, "ज्या दिवसापासून हा गोंधळ झाला तेव्हापासून आम्ही आमच्या मुलांना बाहेर पाठवलेलं नाही. कोणी कोणत्याही धर्माचा असो, प्रत्येकाला आपल्या मुलांसाठी चांगले आयुष्य हवे असते. या दोन्ही घटना योग्य नाहीत. या घटनांचा आमच्या मुलांवर खोलवर परिणाम झाला आहे."
 
या हिंसक आंदोलनांना बहुसंख्य समाजातील सगळ्यांचंच समर्थन आहे असं नाही.
 
किराणा दुकान चालवणारे दीपक गुप्ता सांगतात की, "दोन्ही बाजूंनी चुका झाल्या आहेत. हे करण्याआधी जावेदने काय नुकसान होईल याचा विचार करायला हवा होता. ती गाय होती की नाही, हे माहित नाही पण तो फोटो अस्वस्थ करणारा होता. आमच्याही लोकांची चूक आहे, फोटोची शहानिशा न करता त्यांनी याला धार्मिक दंगलीचं स्वरूप दिलं. त्यामुळे हिंदू-मुस्लीम समाजातील दरी आणखी वाढली आहे."
 
सिरमौरचे जिल्हाधिकारी सुमित खिमटा बीबीसीशी बोलताना सांगतात की, "आता हे प्रकरण शांत झालं आहे. गुरुवारी नाहानमध्ये सर्व समुदायांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावण्यात आली होती, ज्यामध्ये शांततेचं आवाहन करण्यात आलं होतं. पोलीस कारवाई करत आहेत. स्थानिक लोक समाधानी आहेत."
 
Published By- Dhanashri Naik