जिभेच्या ऑपरेशनऐवजी 3 वर्षांच्या मुलाची खतना, आयुष्य उद्ध्वस्त
यूपीच्या बरेलीमध्ये डॉक्टरांनी एका 3 वर्षाच्या चिमुकल्यासोबत जे केले ते धक्कादायक आहे. येथे एका 3 वर्षाच्या चिमुरड्याच्या जिभेवर ऑपरेशन करायचे होते, मात्र डॉक्टरांनी जिभेवर ऑपरेशन न करता मुलाची खतना केली. डॉक्टरांच्या या कृत्यामुळे मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. डॉक्टरांवर हे आरोप झाल्यानंतर तक्रार करण्यात आली. प्राथमिक चौकशीनंतर रुग्णालयाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण : बरेलीमध्ये राहणाऱ्या एका दाम्पत्याचा 3 वर्षांचा मुलाला बोलण्यात अडचण येत होती. त्यामुळे पालकांनी त्याला जिभेचे ऑपरेशन करण्यासाठी दाखल केले. ऑपरेशननंतर मुलाच्या वडिलांनी आपल्या मुलाची खतना केल्याचा आरोप केला आहे. घटना 23 जूनची आहे. याप्रकरणी मुलाच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ही बाब उघडकीस आल्यानंतर काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालय आणि बारादरी पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने केली.
काय म्हणाले मुलाचे वडील : मुलाच्या वडिलांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, आपल्या मुलाला बोलण्यात अडचण आल्याने आपण त्याला डॉक्टरांकडे घेऊन आलो. जिभेचे ऑपरेशन करावे लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले होते. यावर मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता डॉक्टरांनी मुलाच्या प्रायव्हेट पार्टवर शस्त्रक्रिया केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
गुप्तांगात संसर्ग झाला: बरेलीचे सीएमएचओ बलवीर सिंग यांनी मीडियाला सांगितले की आम्ही रुग्णालयाचे रेकॉर्ड तपासले आहेत. गुप्तांगात संसर्ग झाल्यामुळे डॉक्टरांनी खतना करण्याचे नमूद केलेल्या कागदपत्रावर मुलाच्या वडिलांनी स्वाक्षरी केल्याचे तपासात समोर आले आहे. कदाचित डॉक्टरांनी ऑपरेशनचे स्पष्टपणे पालकांना स्पष्टीकरण दिले नाही. त्यामुळे हे निष्काळजीपणाचे प्रकरण मानून रुग्णालयाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. रुग्णालयातील रुग्णांना इतर रुग्णालयात हलविण्यात येत आहे.
डॉक्टर म्हणाले- आमची चूक नाही : मुलावर शस्त्रक्रिया करणारे डॉ. खान यांनी मीडियाला सांगितले की, माझ्यावर लावलेले सर्व आरोप चुकीचे आहेत. मुलाला लघवी करण्यास त्रास होत असल्याचे सांगून पालकांनी मुलाला आणले होते. आम्ही त्यांना सांगितले की त्याच्यावर ऑपरेशन करावे लागेल. मुलाची सुंता करण्यात येईल, असे नमूद करणाऱ्या कागदपत्रावरही त्यांनी स्वाक्षरी केली आहे.