शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 30 जुलै 2020 (09:05 IST)

गरोदर महिलांसाठी ESIC स्कीम अंतर्गत प्रसूती खर्चासाठी मिळणार वाढीव रक्कम

कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ESIC) आरोग्य विमा योजनेंतर्गत प्रसूतीचा खर्च 7,500 रुपयांपर्यंत वाढवण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. सध्या ही रक्कम 5,000 हजार रुपये आहे. ईएसआयसीच्या आरोग्य विमा योजनेअंतर्गत विमाधारक महिला कर्मचारी किंवा विमा उतरलेल्या पुरुष कर्मचार्‍याच्या पत्नीसाठी प्रसूती खर्च दिला जातो. कामगार व रोजगार मंत्रालयाने सोमवारी याबाबत अधिसूचना जारी केली आहे. सरकारने या भागधारकांना याबाबत 30 दिवसांच्या आत सूचना देण्यास सांगितले आहे. त्यानंतर सरकार याबाबत अंतिम निर्णय घेईल. ईएसआय योजना कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) चालवते.
 
काय आहे नियम ?
कर्मचार्‍यांच्या राज्य विमा नियम 1950 च्या नियम 56ए च्या अंतर्गत सरकारने 5,000 रुपयांचे मातृत्व सहाय्य वाढवून 7,500 रुपये करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. हा प्रसूती खर्च ज्या ठिकाणी ईएसआयसी अंतर्गत अनिवार्य आरोग्य सुविधा उपलब्ध नसतात अशा स्त्रियांना दिला जातो. हा प्रसूती खर्च केवळ दोन मुलांसाठी प्रदान केला जातो.
 
दरम्यान कोविड – 19 च्या कठीण काळात दिलासा देण्यासाठी ईएसआय लाभार्थ्यांच्या हितासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. ईएसआयसी लाभार्थ्यांना आवशक्यता असल्यास आयसीएमआरची टाय- अप खाजगी प्रयोगशाळेत कोविड-19 चाचणी करण्याची परवानगी दिली आहे. त्याचबरोबर, कोविड – 19 शी संबंधित उपचारासाठी टाय- अप खासगी रुग्णालयाद्वारे वैद्यकीय सेवा मिळविण्यासाठी पर्यायी तरतूद केली आहे. या व्यतिरिक्त, ईएसआय लाभार्थ्याला त्यांच्या परिस्थितीनुसार कोणत्याही संदर्भ पत्राशिवायही या रुग्णालयात विहित माध्यमिक / एसएसटी सल्लामसलत / भरती / आपत्कालीन / विना-आपत्कालीन वैद्यकीय उपचार यासारख्या वैद्यकीय सेवा मिळवू शकतात.