शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 23 जुलै 2023 (10:41 IST)

टिकटॉकवरचे व्हीडिओ पाहून प्रेमात पडली, सीमा हैदरप्रमाणे आपला देश सोडून ती भारतात आली

sartaj alam
“माझ्या हातात असेल तर मी उद्याच शादाबसोबत लग्न करेन.”
नुकतेच पोलंडहून आपल्या मुलीला घेऊन भारतात आलेली बार्बरा पोलॉक बोलत होती. बार्बरा बोलत असताना तिचा प्रियकर शादाब याच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहताक्षणीच समजू शकत होतं.
 
27 वर्षीय शादाब आलम म्हणतो, “आमचं एकमेकांवर प्रेम आहे. पण आम्हाला कायदेशीर पद्धतीने लग्न करायचं आहे. आगामी काळात आम्हाला कोणत्याही अडचणींना तोंड द्यायचं नाही.”
 
44 वर्षीय बार्बरा पोलॉक ही आपली 7 वर्षीय मुलगी आनिया पोलॉक हिला सोबत घेऊन जून महिन्यातील शेवटच्या आठवड्यात भारतात दाखल झाली होती.
 
भारतात आल्यानंतर ती सर्वप्रथम आपला प्रियकर शादाब आलम याला भेटली. त्यानंतर तिघांनी मिळून दिल्लीतील पर्यटन स्थळांना भेटी दिल्या. यानंतर तिघेही शादाबच्या मूळ गावी म्हणजेच झारखंडमधील हजारीबाग येथे पोहोचले.
 
शादाब सांगतो, “आम्ही दिल्लीत फिरत होतो, त्यावेळी लोकांना बार्बरा आणि आनिया यांच्यासोबत फोटो काढायचे होते. त्या दोघी जणू काय सेलिब्रिटी आहेत, असं ते करत होते.”
 
बार्बराचं म्हणणं काय?
बार्बराला आम्ही पहिल्यांदा भेटलो, तेव्हा तिने सर्वप्रथम आम्हाला नमस्कार केला.
 
हे कुठून शिकलं, असं आम्ही स्वाभाविकपणे विचारलं. ती म्हणाली, गावात येऊन मी या गोष्टी शिकल्या आहेत.
 
ती म्हणते, “सुरुवातीला मी गावात आले तेव्हा काही लोक आम्हाला भेटण्यासाठी आले. ते शादाबला ज्या पद्धतीने नमस्कार करतात, ते मी शिकून घेतलं. तेव्हापासून मीसुद्धा लोकांना नमस्कार करते.
 
आमचं बार्बरासोबतचं संभाषण इंग्रजीतच झालं. त्यांनी काही प्रश्नांचं उत्तर पोलिशमध्ये दिलं. शादाबने अनुवाद करून त्याचा अर्थ आम्हाला सांगितला.
 
भारताचं कौतुक करताना बार्बरा म्हणाली, “अतिथी देवो भव म्हणणारा भारत अतिशय सुंदर देश आहे. इथले लोक खूपच मनमिळाऊ आहेत. इथली फळंही चवीला अत्यंत गोड लागतात. इथलं जेवण मला आवडतं.”
 
आपल्या मुलीविषयी तिने सांगितलं, “माझी मुलगी इथे सुट्ट्या घालवून खूप आनंदी आहे. ती शादाबसोबत चांगली मिसळली. ती त्याला आतापासूनच डॅडी म्हणू लागली आहे. दोघे मिळून खूप मस्ती मजा करतात.”
 
व्हिजिटिंग व्हिसा घेऊन भारतात आलेली बार्बरा म्हणाली की ती पहिल्यांदाच भारतातील एखाद्या गावात आली आहे.
 
ती पुढे म्हणाली, “या खुटरा गावची संस्कृती मला खूप आवडली. पण इथली घरे खूप लहान आहेत. पोलंडमध्ये घरे मोठी असतात. पण तरीही शादाबसोबत इथे राहून मी प्रचंड आनंदी आहे.”
 
बार्बरा आणि शादाबची भेट
महाराष्ट्रात पदवीचं शिक्षण पूर्ण करणारा शादाब सांगतो की तो स्वतः एक चांगला डान्सर आहे.
 
तो म्हणाला, “मी डान्सचे व्हीडिओ बनवून टिकटॉकवर पोस्ट करत होतो. ते पाहून बार्बरा मला फॉलो करू लागली. बार्बराने अनेकवेळा तिच्या अकाऊंटवरून मला मेसेज केले. पण त्यावरील विदेशी महिलेचा डीपी पाहून मी त्याकडे दुर्लक्ष करायचो.
 
हा एखादा फ्रॉड अकाऊंट आहे की काय अशी मला भीती होती. त्यामुळे मी त्याला रिप्लाय देत नव्हतो. पण तिने माझ्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू ठेवले.”
 
शादाब म्हणतो, “टिकटॉक बंद झाल्यानंतर मी इन्स्टाग्रॅमवर पोस्ट करू लागलो. तिथेही बार्बरा मला फॉलो करायची. एके दिवशी मी इन्स्टाग्रॅमवर लाईव्ह करत होतो, त्यावेळी तीसुद्धा ते पाहण्यासाठी आली. तेव्हाही तिने माझ्याशी संपर्क साधण्याची इच्छा प्रकट केली. त्यानंतर मी तिला माझा मोबाईल नंबर दिला. त्यानंतर व्हॉट्सअपवर आमचं बोलणं सुरू झालं. तो लॉकडाऊनपूर्वीचा काळ होता.”
 
शादाबने पुढे सांगितलं, “बार्बरा मला नेहमी लाल गुलाब मेसेजमध्ये पाठवून द्यायची. ते पाहून मला तिच्या प्रेमाची जाणीव झाली. पण एके दिवशी बार्बरानेच स्वतःहून मला प्रपोज केलं. मीसुद्धा त्याचा स्वीकार केला.”
 
शादाब म्हणतो, “मी सोशल मीडियावर खूपच सक्रिय राहायचो. ते पाहून बार्बराने मला त्यामध्ये आपला वेळ न घालवण्याचा सल्ला दिला. माझं आयुष्य अधिक चांगलं व्हावं, यासाठी ती प्रेरित करायची. समजवायची, रागवायची, एक यशस्वी माणूस बनण्यासाठी कामावर लक्ष केंद्रीत कर, असं ती मला म्हणायची. बार्बराचं हे माझी काळजी घेणं मला आवडू लागलं. आम्ही एकमेकांसाठीच बनलो आहोत, असं मला वाटू लागलं.”
 
बार्बरा म्हणाली, “मी शादाबसाठी पोलंडचा व्हिजिटिंग व्हिसा बनवून घेतला. पण काही कारणामुळे तो येऊ शकला नाही. त्यामुळे मी शादाबला भेटण्यासाठी 2021 च्या अखेरीस भारतात आले होते.
 
शादाब पुढे सांगतो, “अनेक प्रयत्नांनंतरही काही कागदोपत्री अडचणींमुळे मी पोलंडला जाऊ शकलो नाही. त्यामुळे बार्बराच मुलीला घेऊन भारतात आली.
 
बार्बराला आता शादाब आलम याच्याशी लग्न करायचं आहे. ती म्हणते, “मी शादाबला समजावलं आहे की आमचं एकमेकांवर प्रेम आहे. आता त्याला मूर्त रूप देण्याची आवश्यकता आहे.”
 
लग्न कधी करणार?
या प्रश्नाच्या उत्तरादाखल बार्बराने लगेच म्हटलं, “माझ्या हातात असेल आणि शक्य झालं तर मी उद्याच लग्न करेन. पण आम्ही दोघेही वेगवेगळ्या देशांतून आहोत. त्यामुळे कागदपत्रांची पूर्तता करून कायदेशीर विवाह आम्हाला करायचा आहे. त्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.”
 
लग्नानंतर भारतातच राहणार की शादाबला घेऊन पोलंडला निघून जाणार याबाबत ती म्हणाली, “लग्नानंतर मी शादाबला घेऊन पोलंडला जाईन. तिथे माझी कंस्ट्रक्शन कंपनी आहे. तिथे शादाबही काम करू शकतो.”
 
“पण भविष्यात आम्हाला वाटलं तर पुन्हा भारतात येण्याचीही माझी तयारी आहे. मी इथे एखाद्या हॉटेलचा बिझनेस करू शकते. मला कायम शादाबसोबतच राहायचं आहे. त्यासाठी कोणताही त्याग करण्यास मी तयार आहे,” असंही तिने म्हटलं.
 
शादाब म्हणाला, “मी बार्बराशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे सर्वप्रथम लग्न करून मी बार्बरासोबत पोलंडला जाईन. ती माझ्या भविष्याबाबत सतत चिंताग्रस्त असते.
 
बार्बराचा भूतकाळ
बार्बराने आम्हाला तिच्या भूतकाळाविषयीही माहिती दिली.
 
तिने सांगितलं, “ज्या व्यक्तीसोबत माझं लग्न झालं होतं, ते आता वेगळे होऊन स्वीत्झर्लंडमध्ये राहतात. तर आमची मुलगी आनिया माझ्यासोबतच पोलंडमध्ये राहते. आता शादाब हेच तिचे वडील आहेत.
शादाब म्हणतो, “बार्बराने मला सर्व काही सांगितलेलं आहे. तिने एक गोष्टही माझ्यापासून लपवलेली नाही. सुरुवातीपासून ती पूर्वीचं लग्न आणि मुलगी यांच्याबाबत सांगत होती. आता मला त्याविषयी चर्चा करायची नाही. आनिया खूपच गोड मुलगी आहे.”
 
बार्बराला भारतीय भाषा येत नाही, तुला पोलिशही येत नाही, तर मग तुम्ही एकमेकांशी कसा संवाद साधता, हा प्रश्न विचारल्यानंतर तो म्हणाला, “बार्बराला इंग्लिश समजतं, मला इंग्लिश येतं, ती पोलिश ट्रान्सलेटरच्या मदतीने ते समजून घेते. सुरुवातीला मला पोलिश समजायचं नाही. पण आता मलाही ते समजू लागलं आहे.”
 
शादाबचं कुटुंब
शादाबला आईवडील नाहीत. त्याच्या तीन बहिणी आहेत, तर एक मोठा भाऊही आहे. तिन्ही बहिणींचं लग्न झालेलं आहे. मोठा भाऊ कोलकात्याला राहतो.
 
शादाब लहान असतानाच त्याच्या आईचं निधन झालं. त्यानंतर काही वर्षांनी त्याचे वडीलही रस्ते अपघातात मरण पावले.
 
त्यानंतर शादाबचं संगोपन त्याच्या मामांनी मुंबईत केलं.
 
शादाब म्हणतो, “ते सर्व जण त्यांच्या संसारात सुखी आहेत. आता केवळ मीच उरलो आहे, मीसुद्धा बार्बरासोबत लग्न करून संसार सुरू करणार आहे.”
 
“सुरुवातीला माझ्या बहिणींना बार्बराला पाहून धक्का बसला होता. पण त्यांची त्याविषयी काहीच हरकत नाही. मी त्यांची लवकरच बार्बरासोबत भेट करून देईन.
 
कोरोना लॉकडाऊनच्या काळात शादाब आलमची नोकरी गेली होती. तेव्हापासून बार्बरा त्याला मदत करत असते. शादाबने पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर हार्डवेअर नेटवर्किंगमध्ये डिप्लोमाचा कोर्स केला. त्यानंतर मुंबईत एके ठिकाणी तो आयटी इंजिनिअर म्हणून काम करत होता.
 
बार्बरा शादाबच्या घरी आली तेव्हा...
हजारीबागमध्ये घालवलेल्या दिवसांचा उल्लेख करताना शादाब म्हणाला, “आम्ही काही दिवस हॉटेलमध्ये राहिलो. त्यानंतर तिने हजारीबागमध्ये माझ्या गावी राहण्याची इच्छा मला बोलून दाखवली. तेव्हा मीसुद्धा तिला घेऊन गावी खुटरा येथे आलो.
 
त्यानंतर गावातील लोक रोजच बार्बराला भेटण्यासाठी त्यांच्या घरी जात असतात.
शादाब म्हणतो, लोकांना तिला भेटून तिच्यासोबत सेल्फी घ्यायचा असतो. पण यासाठी मुलगी आनिया काहीवेळा तयार नसते. पण ती इथे येऊन नक्कीच आनंदी आहे.
 
बार्बरा दुसऱ्या धर्मातील दुसऱ्या देशातील आहे. तिला घरी आणल्यानंतर गावकऱ्यांची प्रतिक्रिया काय होती? या प्रश्नाचं उत्तर देताना शादाब म्हणाला, “बार्बरा आल्यापासूनच गावकरी उत्साहात होते. काहींनी आमच्या लग्नाबाबत विचारलं, तेव्हा मी म्हणालो की आम्ही लवकरच लग्न करणार आहोत.”
 
गावचे सरपंच अनवारूल हक म्हणतात, “शादाबच्या घरची गरीबी आम्ही पाहिली आहे. मुंबईत राहून त्यांनी इंग्रजी शिकली. या मेहनती तरूणाच्या जीवनात एक विदेशी महिला आली. या सगळ्याबाबत गावकऱ्यांना आनंद आहे. शादाबचे दिवस आता बदलतील अशी अपेक्षा आहे.”
 
शादाब लग्नानंतर विदेशात स्थायिक होईल का, याचं उत्तर देताना अनवारूल हक म्हणतात, “शादाबचं आता कुणीही नाही. त्यामुळे त्याला त्याचं आयुष्य त्याच्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे. तो विदेशात स्थायिक झाला, तरी आम्हाला काही अडचण नाही. कारण असं करणाता तो गावचा पहिला तरुण असेल.”
 
“पण दोघांनीही लवकराच लवकर लग्न करावं, असं आम्हाला वाटतं. त्यांचं एकमेकांवरील प्रेम असंच कायम राहावं,” असं त्यांनी म्हटलं.
 
शादाबचं घर बांधण्यासाठी बार्बराची मदत
पाचशे लोकसंख्येच्या खुटला गावात मुख्य रस्त्यापासून सुमारे एक किलोमीटर आत गेल्यानंतर एका मशिदीजवळ शादाबचं वडिलोपार्जित घर आहे.
 
60 वर्षीय अनवारूल म्हणतात, “माझ्या आयुष्यात मी हे घर दुसऱ्यांदा बांधलं जात असताना पाहत आहे. पहिल्यांदा इंदिरा आवास योजनेतून शादाबच्या आजीने हे घर बांधलं होतं. आता पोलंडवरून आलेली शादाबची प्रेयसी हे घर बांधण्यासाठी शादाबची मदत करत आहे.”
 
बांधकाम होत असलेल्या या घरात दोन खोल्या आहेत. एका खोलीत काही सामान ठेवलेलं आहे, दुसऱ्या खोलीत एक पलंग ठेवलेलं आहे. तिथेच भिंतीवर बार्बराचा एक फोटो लावलेला आहे. शादाब म्हणतो, “बार्बरा हॉटेलवरून घरी पहिल्यांदा आली, तेव्हा तिला माझं घर पाहून दुःख झालं. त्यामुळे तिने माझ्या घराचं बांधकाम सुरू केलं.
 
स्थानिक पोलीस उप अधीक्षक राजीव कुमार यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की त्यांनी बार्बराची कागदपत्रे तपासली आहेत. त्यामध्ये कोणतीही अडचण नाही. त्यांचा टुरिस्ट व्हिसा 2028 पर्यंत वैध आहे.
 
राजीव कुमार यांनी शादाबबाबतही माहिती दिली. खुटरा गावचा रहिवासी असलेल्या शादाबचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही, असं ते म्हणाले.
 






Published by - Priya Dixit