बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 12 ऑगस्ट 2024 (13:17 IST)

मनीष सिसोदिया तुरुंगाबाहेर, ते आता अरविंद केजरीवालांची जागा घेतील का?

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सुप्रीम कोर्टाने 9 ऑगस्ट रोजी जामीन मंजूर केला आहे. त्यांना 26 फेब्रुवारी 2023 रोजी अटक करण्यात आली होती.
कोर्टाच्या या निर्णयानंतर मनीष सिसोदिया 530 दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर आले आहेत.
सिसोदिया यांची सुटका झाली तेव्हा दिल्लीच्या तिहार तुरुंगाबाहेर आम आदमी पक्षाच्या समर्थकांची मोठी गर्दी जमली होती.
तुरुंगाबाहेर समर्थकांना संबोधित करताना सिसोदिया म्हणाले, तुम्हा सर्वांना आझाद (स्वतंत्र) मनीष सिसोदियाचा नमस्कार.
 
तुरुंगातून सुटल्यानंतर सिसोदिया यांनी तुरुंगात असलेले मुख्यमंत्री आणि पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली.
 
दुसऱ्या दिवशी आम आदमी पार्टीच्या कार्यालयात पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना मनीष सिसोदिया म्हणाले की, "केजरीवाल यांना जास्त काळ तुरुंगात ठेवता येणार नाही. आम्ही फक्त रथाचे घोडे आहोत, आमचा खरा सारथी अजूनही तुरुंगातच आहे. तोही लवकरच बाहेर येईल आणि आम्ही तो म्हणेल तशी वाटचाल करू."
 
मनीष सिसोदिया ज्या मंचावरून भाषण देत होते त्यामागे अरविंद केजरीवाल यांचा मोठा फोटो लावला होता. दिल्लीतील प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी चांगल्या शाळा बांधणार असल्याची घोषणा मनीष सिसोदिया यांनी त्यांच्या भाषणात केली. मनीष सिसोदिया यांनी दिल्लीचे शिक्षणमंत्री म्हणून आधी काम केलं आहे.
 
सिसोदिया म्हणाले की, "मी रक्त सांडून कष्ट करण्यासाठी बाहेर आलो आहे, सुट्टी साजरी करण्यासाठी नाही. आज, आत्ता या क्षणापासून आम्ही हे अभियान सुरू केलं आहे."
 
मनीष सिसोदिया 17 महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर आले आहेत. कोर्टाने त्यांच्यावर मंत्रालयात जाण्याची बंदी घातलेली नाही. पण तसं असलं तरी सध्या दिल्ली सरकारमध्ये त्यांच्याकडे कोणतंही पद नाही.
 
कथित दारू घोटाळ्यात चौकशी सुरू असलेले मनीष सिसोदिया आम आदमी पक्षातले दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत.
 
त्यामुळं तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मनीष सिसोदिया यांची दिल्ली सरकार आणि आम आदमी पक्षात भूमिका काय असेल, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
 
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात असून त्यांनी पदाचा राजीनामा दिलेला नाही.
 
सिसोदिया तुरुंगातून बाहेर आले असून त्यांच्या पदभार स्वीकारण्यात कोणताही कायदेशीर अडथळा नाही. मात्र, सिसोदिया आपल्या पदावर कधी परतणार हे आम आदमी पक्षाने अद्याप स्पष्ट केलेले नाही.
 
रविवारी संध्याकाळी सहा वाजता मनीष सिसोदिया यांच्या घरी आम आदमी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार होती. बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा होणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आलं होतं.
 
आम आदमी पार्टीच्या प्रवक्त्या प्रियंका कक्कर म्हणाल्या की, "मनीष सिसोदिया तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पक्ष उत्साहात आहे. पक्षाला नवी शक्ती मिळाली आहे."
पक्ष आणि सरकारमध्ये सिसोदिया यांची भूमिका काय असेल या प्रश्नाचं थेट उत्तर टाळत त्या म्हणाल्या की, "या बैठकीत यावरही निर्णय होईल."
 
आम आदमी पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अरविंद केजरीवाल जोपर्यंत तुरुंगातून बाहेर येणार नाहीत तोपर्यंत पक्ष आणि सरकारची धुरा मनीष सिसोदिया यांच्या खांद्यावर असेल.
 
मनीष सिसोदिया यांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर केलेल्या पहिल्या भाषणात वारंवार अरविंद केजरीवाल यांच्या नावाचा उल्लेख केला. त्यांनी केजरीवाल यांना रथाचा सारथी म्हटलं तर स्वतः त्या रथाचा घोडा असल्याचंही सांगितलं.
 
मनीष सिसोदिया हे केजरीवाल यांचे सर्वात जवळचे आणि अत्यंत विश्वासू सहकारी आहेत यात शंका नाही.
 
राजकारणात येण्यापूर्वी केजरीवाल एनजीओ चालवत होते, तिथे मनीष सिसोदिया आणि केजरीवाल यांनी खांद्याला खांदा लावून काम केलं होतं. भ्रष्टाचाराविरुद्धच्या आंदोलनात सुरुवातीपासून ते केजरीवाल यांच्या बरोबरीने उभे राहिले होते.

राजकीय विश्लेषकांना असं वाटतं की, केजरीवाल यांच्यानंतर मनीष सिसोदिया हे पक्षाचे सर्वात मोठे नेते आहेत. आता केजरीवाल यांच्या अनुपस्थितीत पक्षाची जबाबदारीही त्यांच्याच हाती असेल.
 
ज्येष्ठ पत्रकार मुकेश केजरीवाल म्हणतात की, "अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यात उत्तम समन्वय आहे आणि दोघेही नीकटवर्तीय आहेत. मनीष तुरुंगाबाहेर आणि केजरीवाल तुरुंगात असल्यानं पक्ष आणि सरकार यांच्यात मतभेद होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं काम हे सिसोदिया यांच्या मार्गदर्शनाखाली व्हायला हवे."
 
मुकेश केजरीवाल म्हणाले की, "सिसोदिया आणि केजरीवाल खूप दिवसांपासून एकत्र आहेत. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनापासून ते सरकार चालवण्यापर्यंत या दोघांनी एकत्र काम केलं आहे."
अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्याबद्दल बोलताना मुकेश यांनी सांगितलं की, "केजरीवाल आणि मनीष यांच्यात मतभेद झाल्याचा एकही प्रसंग आलेला नाही. मनीष सिसोदिया यांना आम आदमी पक्षातील दुसऱ्या क्रमांकाच्या नेत्याचा मान आहे. अशा परिस्थितीत केजरीवाल यांच्या अनुपस्थितीत त्यांनी कमान हाती घेतल्यास, याबाबत फारशी नाराजी असणार नाही."
 
याआधी आम आदमी पक्षाने दिल्ली सरकारच्या शिक्षण धोरणाचा चेहरा म्हणून मनीष सिसोदिया यांनाच पुढे केलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी अनेकवेळा मनीष सिसोदिया यांचं उघडपणे कौतुक केलेलं आहे.
 
मात्र, अरविंद केजरीवाल तुरुंगात गेल्यानंतर त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल याही आता राजकीय भूमिकेत आल्या असून, अरविंद केजरीवाल यांच्या अनुपस्थितीत त्या पक्षाच्या प्रचार कार्यात सहभागी झाल्या आहेत.
 
रविवारीच सुनीता केजरीवाल यांनी हरियाणात पक्षाच्या परिवर्तन रॅलीला हजेरी लावली आणि प्रचार केला. सुनीता केजरीवाल यांनी अरविंद केजरीवाल सरकारने केलेल्या कामांची लोकांना वारंवार आठवण करून दिली.
अशा परिस्थितीत अरविंद केजरीवाल यांच्या अनुपस्थितीत सुनीता केजरीवाल या पक्षाचा प्रमुख चेहरा असणार की आता उपमुख्यमंत्री राहिलेले मनीष सिसोदिया ही जबाबदारी घेणार? हे प्रश्न निर्माण होऊ शकतात.
 
राजकीय विश्लेषकांच्या मते तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मनीष सिसोदिया हेच आता पक्ष आणि सरकारचा प्रमुख चेहरा असतील.
 
ज्येष्ठ पत्रकार हेमंत अत्री सांगतात की, "सुनीता केजरीवाल आज सक्रिय आहेत, पण त्यांना बाहेर पडण्यास भाग पाडले गेले. केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि संजय सिंह तुरुंगात होते. पक्षाला एका चेहऱ्याची गरज होती. सुनीता यांच्या आवाहनाला भावनिक किनार होती, त्यामुळे त्यांना पक्षाच्या कार्यात सहभागी होण्याची संधी मिळाली. सुनीता केजरीवाल यांना पक्षाचा चेहरा बनवलं गेलं पण आता मनीष सिसोदिया बाहेर आले आहेत. भविष्यात तेच पक्षाचा आणि सरकारचा चेहरा असतील."
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे कोणतेही मंत्रालय नव्हते. पण दिल्ली सरकारची बहुतांश महत्त्वाची मंत्रालये मनीष सिसोदिया यांच्याकडे होती.
 
हेमंत अत्री म्हणतात की, "केजरीवाल आणि सिसोदिया यांच्यात कधीच मतभेद झाले नाहीत आणि सिसोदिया यांनी कधी केजरीवाल यांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला नाही. ते स्वत:ला केजरीवालांच्या सावलीतच ठेवतात, अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत केजरीवाल तुरुंगात असताना ते पक्षाची धुरा सांभाळतील.”
 
येत्या काही महिन्यांत हरियाणा आणि दिल्लीत निवडणुका होणार असून, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हरियाणात राजकीय हालचालींना वेग आला आहे.
 
दिल्ली आणि हरियाणा विधानसभेत यश मिळवण्याचं सगळ्यात मोठं आव्हान आम आदमी पक्षासमोर आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष काँग्रेससोबत आघाडी करून लढला होता. तरीही दिल्लीतील सगळ्या जागा राखण्यात भाजप यशस्वी ठरला आहे.
 
आत्तापर्यंत दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाने सहज विधानसभेत विजय मिळवला असला तरी आता तशी परिस्थिती राहिली नसल्याचं विश्लेषकांना वाटतं.
 
भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलनातून जन्माला आलेल्या आम आदमी पक्षाच्याच प्रमुख नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत.
 
पक्षाचे अनेक नेते दीर्घकाळ तुरुंगात राहिले आहे. अरविंद केजरीवाल अजूनही तुरुंगात आहेत. अशा स्थितीत आम आदमी पक्षाची स्थिती आता 'करो या मरो' अशी होईल, असे विश्लेषकांचे मत आहे.
हेमंत अत्री सांगतात की, "सध्या दिल्लीत सरकारशिवाय महानगरपालिका देखील आम आदमी पार्टीकडेच आहे. त्यामुळे आता दिल्लीत सुरु असणाऱ्या भ्रष्टाचार आणि अव्यवस्थेला भाजप जबाबदार असल्याचं पटवून देणं हे आम आदमी पक्षासमोरचं मोठं आव्हान आहे. दिल्लीचं राज्यपाल कार्यालय हेच दिल्लीच्या सत्तेचं प्रमुख केंद्र असल्याचं देखील आम आदमी पक्षाला मतदारांना पटवून द्यावं लागेल."
 
मुकेश केजरीवाल म्हणतात की, "आगामी निवडणुकीत आम आदमी पक्षासाठी 'करा अथवा मरा' अशी परिस्थिती असेल. पक्षाला दिल्लीतील यशाची पुनरावृत्ती करावी लागेल. अशा परिस्थितीत मनीष सिसोदिया यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान पक्षाला राजकीय यशाकडे नेण्याचे असेल."
 
मनीष सिसोदिया यांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अद्याप उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलेलं नाही. मात्र, सिसोदिया पुन्हा या पदावर विराजमान होतील असा विश्वास विश्लेषकांना वाटतो.
 
हेमंत अत्री म्हणतात की, "सिसोदिया काही काळातच दिल्लीचे उपमुख्यमंत्री बनतील. अरविंद केजरीवाल जोपर्यंत तुरुंगातून बाहेर येणार नाहीत तोपर्यंत दिल्लीच्या सत्तेचं केंद्र हे मनीष सिसोदीयाच असतील."
 
मनीष सिसोदिया यांनीही ते पुन्हा कामावर रुजू होण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
 
दरम्यान, आम आदमी पक्षाच्या प्रवक्त्या प्रियंका कक्कर म्हणाल्या की, "सिसोदिया यांच्या जामिनामुळे केजरीवाल जास्त काळ तुरुंगात राहणार नाहीत हेही आता स्पष्ट झालं आहे."
येणाऱ्या निवडणुकीत आम आदमी पक्ष काय करतो हे सिसोदिया यांच्या नेतृत्वावर अवलंबून असेल.
Published By- Priya Dixit