गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 27 जानेवारी 2024 (16:01 IST)

Road Accident: ओडिशाच्या कोरापुटमध्ये दोन दुचाकी आणि तीन वाहनांची धडक, सात जण ठार

accident
ओडिशाच्या कोरापुट जिल्ह्यात शुक्रवारी दोन दुचाकी, एक ऑटोरिक्षा, एक ट्रॅक्टर आणि एक एसयूव्हीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ओडिशात वेगाने जाणाऱ्या एसयुव्हीने दिलेल्या धडकेत 7 जणांना आपला जीव गमवावा लागला. बोरिगुम्मा परिसरात हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तिघांचा जागीच मृत्यू झाला तर जखमींपैकी चौघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर जखमींना स्थानिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
 
अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, त्यात एसयूव्ही आणि ऑटो रिक्षा एकाच दिशेने येत असून ट्रॅक्टर विरुद्ध दिशेने येत असल्याचे दिसून येत आहे. भरधाव वेगाने जाणारी एसयूव्ही रिक्षाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीने ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एसयूव्हीला धडक दिली. यानंतर एसयूव्ही चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्याने रिक्षाला धडक दिली. त्यामुळे रिक्षा पलटी झाली.
 
रिक्षात 15 जण होते. या धडकेनंतर काही प्रवासी रस्त्यावर पडले आणि दोघांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी पुढे सांगितले की, एसयूव्हीने ऑटो-रिक्षाला धडक देताच विरुद्ध दिशेने येणारी दुसरी दुचाकी एसयूव्हीला धडकली आणि दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.हे सगळं 2 ते 3 सेकंदात घडतं. 
 
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती तीव्र शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 3 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांनी जखमींना चांगले उपचार देण्याच्या सूचना दिल्या असून त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
 
 Edited by - Priya Dixit