शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 ऑगस्ट 2021 (10:49 IST)

ट्विटरचे ऍक्शन: राहुल गांधींनंतर,आता काँग्रेसचे खाते लॉक झाले

राहुल गांधी आणि काँग्रेसच्या इतर अनेक नेत्यांनंतर ट्विटरने आता काँग्रेसचे अधिकृत ट्विटर खाते लॉक केले आहे. काँग्रेसने गुरुवारी आरोप केला की ट्विटरने पक्षाचे अधिकृत हँडल @INCIndia लॉक केले आहे. पक्षाने आपल्या फेसबुक पेजद्वारे ही माहिती दिली आहे, तसेच म्हटले आहे की पक्ष आणि त्याचे नेते त्यांना घाबरत नाहीत. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ट्विटरने ही कारवाई केल्याचे मानले जात आहे. सोशल मीडिया कंपनीने यापूर्वी राहुल गांधींसह अनेक काँग्रेस नेत्यांवर अशीच कारवाई केली आहे. 
 
काँग्रेसने आपल्या लॉक केलेल्या ट्विटर खात्याचा स्क्रीनशॉट घेतला आणि तो त्याच्या फेसबुक पेजवर शेअर केला आणि लिहिले- 'जेव्हा आमच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले, तेव्हा आम्ही घाबरलो नाही मग आता ट्विटर खाते बंद करण्यास आम्हाला कशाची भीती वाटेल. आम्ही काँग्रेस आहोत, हा जनतेचा संदेश आहे, आम्ही लढू, आम्ही लढत राहू. बलात्कार पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवणे हा जर गुन्हा असेल तर आम्ही हा गुन्हा शंभर वेळा करू. जय हिंद . सत्यमेव जयते. '
 
या पूर्वी बुधवारी रात्री काँग्रेसने दावा केला होता की रणदीप सुरजेवालासह पाच वरिष्ठ नेत्यांच्या खात्यांवर अशीच कारवाई करण्यात आली आहे. पक्षाने म्हटले होते की, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC)सरचिटणीस आणि माजी केंद्रीय मंत्री अजय माकन, लोकसभेतील पक्षाचे माणिकम टागोर, आसामचे प्रभारी आणि माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि महिला काँग्रेस अध्यक्षा सुष्मिता देव यांचे ट्विटर खाते  निलंबित करण्यात आले होते. 
 
 काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीत बलात्कार आणि हत्या झालेल्या एका नऊ वर्षांच्या मुलीच्या कुटुंबासह आपले फोटो ट्विट केले होते. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) राहुल गांधी यांच्या ट्विटची दखल घेतली आणि अल्पवयीन पीडितेच्या गोपनीयतेचे उल्लंघन केल्याबद्दल काँग्रेस नेत्याच्या खात्यावर कारवाई करण्याचे निर्देश ट्विटरला दिले.
 
यापूर्वी बुधवारी ट्विटरने दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितले होते की राहुल गांधी यांनी 4 ऑगस्ट रोजी केलेल्या ट्विटमुळे कंपनीच्या धोरणांचे उल्लंघन झाले आहे. त्याने बलात्कार पीडितेच्या पालकांसह आपले छायाचित्र ट्विट केले होते. यामुळे त्यांचे खाते तात्पुरते बंद करण्यात आले.