शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 19 एप्रिल 2021 (21:14 IST)

18 वर्षांवरील लोकांनी लस मिळवण्यासाठी नाव कुठे नोंदवायचं?

भारतातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, 1 मे 2021 पासून 18 वर्षे वयाच्या वरील सर्वांचं लसीकरण सुरू करण्यात येणार आहे.
 
आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाबाबतची आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी उच्चपदस्थ अधिकारी आणि डॉक्टरांशी चर्चा केली. या बैठकीनंतर 18 वर्षांवरील लोकांच्या लसीकरणाचा निर्णय जाहीर करण्यात आला.
 
16 जानेवारीपासून भारतात कोव्हिड 19साठीच्या लसीकरणाला सुरुवात झाली आणि 1 मार्चपासून 60 वर्षांवरील नागरिक आणि सहव्याधी असणारे 45 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येत होती. त्यानंतर 1 एप्रिलपासून देशातील 45 वर्षं वयाच्या पुढील सर्व व्यक्तींना कोव्हिडची लस देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
 
सरकारनं आज जाहीर केलेल्या नव्या घोषणांमध्ये 18 वर्षांवरील लोकांच्या लसीकरणावेळी असंही सांगितलंय की, सरकारचे नियम पाळून आणि आधीच्या नियमावलीनुसारच ही लसीकरण मोहीम पुढे नेली जाईल.
 
उपलब्धतेनुसार खासगी रुग्णालयातही लस मिळू शकेल. ही लस पूर्वनियोजित किमतीनुसार उपलब्ध होईल. त्याच बरोबर सरकारची जी लसीकरणाची मोहीम आहे ती देखील सुरू राहणार आहे.
 
तर आपण आता पाहूया की, 18 वर्षांवरील लोकांना लस मिळवण्यासाठी काय करावं लागेल, कुठं नाव नोंदवावं लागेल?
 
लसीकरण मोहीमेसाठी भारत सरकारनं को-विन (Co-WIN) नावाचा डिजीटल प्लॅटफॉर्म विकसित केलाय. हा प्लॅटफॉर्म लसीकरण मोहीम राबवणारी यंत्रणा, लस देणारी आरोग्य सेवा आणि लस घेणाऱ्या व्यक्ती या सगळ्यांना वापरता येतो.
 
कोविन (Co-WIN) अॅप काय आहे?
कोविन (Co-WIN) हे अॅप म्हणजे कोव्हिड 19साठीची लसीकरण मोहीम राबवण्यासाठीचा डिजीटल प्लॅटफॉर्म आहे. हे मोबाईल अॅप लसीकरणाविषयीची आकडेवारीही नोंदवेल. यासोबतच सगळ्या राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशातील आरोग्य कर्मचाऱ्यांचा एक डेटाबेसही हे अॅप तयार करेल. पण या Co-WIN अॅपच्या नावावरून काहीसा गोंधळ आहे. अधिकृत वेबसाईटवर कोविनचं पूर्ण नाव लिहीण्यात आलंय Co-WIN : Winning over COVID 19. पण भारतीय माध्यमांनी याला कोव्हिड व्हॅक्सन इंटेलिजन्स नेटवर्क असंही म्हटलंय.
 
कोविन (Co-WIN) अॅप डाऊनलोडसाठी अॅप स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. आपण डाऊनलोड करत असलेलं अॅप हे भारत सरकारने आणलेलं अॅपच आहे ना, याची खात्री करून मगच ते डाऊनलोड करा. याच नावाची इतर काही फसवी अॅप यापूर्वी आली होती.
 
लशीसाठी नोंदणी कशी करायची?
कोविनच्या वेबसाईटवरून किंवा कोविन अॅपवरून लसीकरणासाठी नोंदणी करणं बंधनकारक आहे. जेणेकरून लसीकरण केंद्र, तारीख, वेळ इत्यादी माहिती तुम्हाला आधीच कळवलं जाईल.
 
नोंदणीसाठी https://www.cowin.gov.in/home या वेबसाईटवर जा.
 
वेबसाईट उघडल्यानंतर स्क्रोल करून खाली या, तिथे तुम्हाला 'Find Your Nearest Vaccination Center' हा पर्याय दिसेल. यावरील Registration Yourself या पर्यायावर क्लिक करा.
 
त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाईल आणि त्यावर OTP येईल. तो OTP टाकल्यानंतर नवीन विंडो उघडेल.
 
त्यानंतर Register for Vaccination ची विंडो दिसेल. फोटो आयडी प्रूफ, फोटो आयडी नंबर, नाव, जन्मतारीख, लिंग आणि सहव्याधी इत्यादी माहिती इथे तुम्हाला द्यावी लागेल. त्यानंतर Register पर्यायावर क्लिक करा.
 
त्यानंतर तुम्हाला अकाऊंट डिटेल्स दिसतील. एका मोबाईल नंबरच्या नोंदणीत तुम्हाला तीन जणांसाठी लसीकरणाची नोंद करता येऊ शकते. त्यासाठी Add या पर्यायावर क्लिक करून पुढील नावं आणि त्यांची माहिती समाविष्ट करता येईल. एखादं नाव डिलिट करण्याचाही पर्याय देण्यात आला आहे.
 
या अकाऊंट डिटेल्सच्या पानावरच युजर लसीकरणाची तारीख देऊ शकतात.
 
नंतर तुम्ही लसीकरण केंद्रासाठीही संपूर्ण माहिती भरू शकता. राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि पिन कोड अशी माहिती दिल्यानंतर सर्च पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला लसीकरण केंद्रांची यादी दिसेल.
 
तुम्हाला जवळ असलेल्या केंद्रावर क्लिक केल्यानंतर उपलब्ध वेळ सांगितली जाईल. तिथे Book पर्यायावर क्लिक केल्यानंतर Appointment Confirmation चं पान उघडेल. तिथे Confirm करा.
 
तुम्हाला नोंदणी झाल्याचा संदेश स्क्रीनवर दिसेल. ते पान तुम्हाला डाऊनलोडही करता येईल.
 
कोविन अॅपवरची 5 मॉड्यूल्स काय आहेत आणि कशासाठी आहेत?
कोविन (Co-WIN) अॅपवर - व्यवस्थापन, नोंदणी, लसीकरण, पोचपावती आणि माहिती अशी पाच मॉड्यूल्स असतील. आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं, "या मॉड्यूलच्या मदतीने अधिकाऱ्यांना नवीन सेशन तयार करता येईल आणि त्या त्या लसीकरण अधिकारी आणि मॅनेजर्सना याची माहिती मिळेल."
 
रजिस्ट्रेशन मॉड्यूलद्वारे लोकांना लसीकरणासाठी नोंदणी करता येईल. शिवाय स्थानिक अधिकाऱ्यांनी गोळा केलेला सहव्याधी (Co morbidities) असलेल्या लोकांची माहितीही यावर अपलोड होईल.
 
हे लसीकरण करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी 'अॅडमिनिस्ट्रेटर' मॉड्यूल असेल. यामध्ये नागरिकांनी भरलेली माहिती अधिकाऱ्यांना पाहता येईल. त्यानंतर हे अधिकारी लसीकरणासाठीची 'सेशन्स' तयार करतील आणि त्यानुसार ती सेशन्स राबवणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यकत ती माहिती मिळेल.
 
नोंदणी करणाऱ्या व्यक्तीने पुरवलेल्या माहितीची खातरजमा या अॅपमधल्या वॅक्सिनेशन मॉड्यूलद्वारे अधिकाऱ्यांना करता येईल आणि त्यांना लस दिल्यानंतर या व्यक्तीचा स्टेटसही अपडेट करता येईल.
 
पोचपावतीसाठीच्या 'बेनिफिशियरी अॅक्नॉलेजमेंट मॉड्यूल' द्वारे QR कोड सर्टिफिकेट जनरेट होतील आणि लस दिल्यानंतर त्याव्यक्तीला तसा SMSही पाठवला जाईल.
 
तर 'रिपोर्ट' मॉड्यूलच्या मदतीने लसीकरणाच्या सेशन्सची माहिती - किती सेशन्स झाली, किती लोकांना लस दिली आणि कोण आलं नाही ही माहिती अधिकाऱ्यांना नोंदवता येईल.
 
कोविन (Co-WIN) अॅपवर नोंदणीसाठी कोणती कागदपत्रं लागतील?
नोंदणी करण्यासाठी फोटो असणारं ओळखपत्रं असणं आवश्यक असेल. स्वतःची नोंदणी करताना इलेक्ट्रॉनिक KYC साठी ओळखपत्रं स्कॅन करून जोडावं लागेल. यासाठी 12 ओळखपत्रांचा पर्याय देण्यात आलेला आहे.
 
ही कागदपत्रं वापरता येतील -
 
मतदार ओळखपत्र
आधार कार्ड
ड्रायव्हिंग लायसन्स
पॅन कार्ड
मनरेगा रोजगार कार्ड
बँक किंवा पोस्ट ऑफिसचं पासबुक
पासबुक
पेन्शनची कागदपत्रं
नोंदणी करताना जे ओळखपत्रं वापरण्यात आलेलं आहे, तेच ओळखपत्र लस घेण्यासाठी जाताना दाखवावं लागेल. त्यावेळी इतर ओळखपत्रं वापरता येणार नाहीत.
 
कोविन अॅप कसं काम करेल?
कोव्हिड 19साठीच्या लसीकरण मोहीमेचं नियोजन, अंमलबजावणी आणि देखरेख या सगळ्यासाठी तयार करण्यात आलेलं हे एक क्लाऊड बेस्ड अॅप आहे. या अॅपच्या माध्यमातून लशीच्या डोसेसचं रिअर टाईम ट्रॅकिंग करता येईल. या अॅपमध्ये असणाऱ्या मॉड्यूल्सच्या मदतीने स्थानिक अधिकाऱ्यांना मोठी आकडेवारी अपलोड करता येईल.
 
लस घेण्यासाठी या अॅपवरून नोंदणी केल्यानंतर ही नोंदणी करणाऱ्याला SMS मार्फत तारीख, वेळ आणि लसीकरण केंद्राचा तपशील पुरवला जाईल.
 
प्रत्येक व्यक्तीला लशीचे दोन डोस घ्यावे लागणार असल्याने पहिला डोस घेतल्यानंतर परत कधी येऊन तुम्हाला दुसरा डोस घ्यायचा आहे, याची माहितीही हे अॅप देईल.
 
लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर त्या व्यक्तीला QR कोडच्या स्वरूपातलं सर्टिफिकेट दिलं जाईल.