1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 जानेवारी 2015 (10:51 IST)

पावणेचार लाखांचा स्मार्टफोन

लास वेगामध्ये सुरू असलेल्या एका प्रदर्शनात पावणेचार लाखांची लॅम्बॉर्गिनी झळकत आहे. हे वाचून तातडीने बुकिंग करण्याचा विचार करू नका. कारण ही कार नसून एक लक्झरीस स्मार्टफोन आहे.
 
सध्या लास वेगासमध्ये कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्सचे प्रदर्शन भरले असून टोनिनो लॅम्बोर्गिनी या इटालिन कंपनीने 6 हजार डॉलर्सचा 88 टौरी हा स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीने जगभरात त्याची विक्री करण्याची घोषणा केली आहे. लॅम्बॉर्गिनी या स्पोर्टस्कारसारखेच लक्झझरीस अशा या मॉडेलसाठी भारतात तब्बल 3 लाख 78 हजार रुपये मोजावे लागणार आहे.
 
लॅम्बॉर्गिनी हे नाव वाचल्याबरोबर इटालिन कार कंपनी लॅम्बॉर्गिनीची वेगवान स्पोर्टी कार नजरेसमोर येते. प्रख्यात ऑटो डिझायनर आणि लॅम्बॉर्गिनी स्पोर्टस्कार कंपनीचा मालक फेरिको लॅम्बोर्गिनी यांचा मुलगा टोनीनो लॅम्बॉर्गिनी याची कंपनी मोबाइल आणि हेडसेट या   उत्पादनांची निर्मिती करते. कंपनीने या आधी 4 हजार डॉलर्सचा स्मार्टफोन बाजारात आणला होता.
 
या 3 लाखांच्या लक्झरीस स्मार्टफोनमध्ये जगभर प्रवास करणार्‍या भटक्यांसाठी इंटरनॅशनल डय़ुअल सिमचा पर्याय दिला आहे. 5 इंचाचा हायडेफिनेशन डिस्प्ले असणार्‍या या मोबाइलला 20 मेगापिक्सल क्षमतेचा रीअर कॅमेरा आणि सेल्फी शूटिंगसाठी 8 मेगापिक्सिलचा फ्रंट  कॅमेरा आहे, तर भरमसाट डाऊनलोडिंगसाठी तब्बल 64 जीबीची इंटर्नल मेमरी देण्यात आली आहे. 3 जीबी रॅम आणि 2.3 गिगाहर्ट्झ स्नॅप ड्रॅगन प्रोसेरमुळे अँप्लिकेशन्स आणि गेम्स सहजगत्या प्ले होतील.