Last Modified: बीजिंग , शुक्रवार, 15 ऑगस्ट 2008 (22:18 IST)
टेनिसमध्ये पदकाची आशा फोल; पेस-भूपती पराभूत
ऑलिंपिकमध्ये भारतासाठी आजचा दिवस अखिल कुमारने केलेला पराक्रम वगळता निराशेचाच ठरला. उपांत्य फेरीत पोहोचलेल्या लिएंडर पेस व महेश भूपती या जोडीकडून भारताला पदकाची आशा होती. मात्र ते पराभूत झाल्याने ही आशाही फोल ठरली. नेमबाज गगन नारंग व संजीव राजपूत यांचाही पदकावरचा नेम चुकला.
एकुणातच नराशेचे वातावरण असताना मुष्टियोद्धा अखिल कुमारने भारताला पदकाची आशा दाखवली. त्याने रशियाच्या विश्वविजेत्याला हरवून उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे.
अभिनव बिंद्रानंतर पेस भूपती या जोडीकडून पदकाची आशा होती. पण उपांत्य फेरीत रॉजर फेडरर व स्वित्झर्लंडच्या स्तेनिस्लास वावरीका या जोडीपुढे त्यांना २-६, ४-६ अशी हार पत्करावी लागली. तीन ग्रॅंड स्लॅम विजेतीपदे पटकावलेली ही जोडी फेडरर व वावरीका या जोडीपुढे पुरती निष्प्रभ झाली होती. टेनिसमध्ये भारताचे आव्हान आता संपले आहे. सानिया मिर्झाने एकेरीतील सामना सोडून देत पराभव स्वीकारला होता. दुहेरीत ती सुनीता रावच्या जोडीने उतरली होती. पण तिथेही पहिल्याच फेरीत त्यांचा पराजय झाला.