शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 15 जानेवारी 2022 (21:42 IST)

अजित पवार म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे - अजित पवार यांचे स्पष्टीकरण

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चक्क मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं आहे. पत्रकारांशी बोलताना राज्यातील निर्बंध आणि नियमावलीवर भाष्य करत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केल्यामुळे अनेकांचा काही काळ गोंधळ उडाला होता.
अजित पवार यांना पत्रकारांनी राज्यातील नियम अधिक कठोर होणार का, असा प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना अजित पवार यांनी ‘जर ऑक्सिजनची मागणी वाढली तर निर्बंध वाढवण्यासंबंधीचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे घेतील, असं विधान केलं. अजित पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्याऐवजी आदित्य ठाकरे यांचं नाव घेतल्यानं आता वेगळ्याच चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार यांनी हा उल्लेख जाणीवपूर्वक केला ही अनावधानानं केला, अशी आता कुजबूज राजकीय वर्तुळात सुरु झाली.
‘नागरिकांच्या जीवाशी खेळ करुन चालणार नाही. रात्रीची संचारबंदी आणि दिवसाची जमावबंदी सरकारनं सुरु केलेली आहे. पण जर ऑक्सिजनची मागणी वाढली, तर मात्र निर्बंध वाढवण्यासंबंधीचा निर्णय, राज्याचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब घेतील,’ अजित पवारांच्या या विधानानं उपस्थित असलेल्या काही जणांच्या भुवया उंचावल्या.
  दादांच्या या स्लीप ऑफ द टंगची दिवसभर बातमी
अजित दादांच्या या स्लीप ऑफ द टंगची दिवसभर बातमी चालल्यानंतर संध्याकाळी अजित पवार यांनी त्यावर खुलासा केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच आहेत. मी आदित्य हा शब्द मागे घेतो आणि त्याठिकाणी उद्धवजी हा शब्द देतो. असं काहीही नाही. आमचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरेंच आहेत, अशी सारवासारव अजित पवार यांनी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यातील आणि पुण्यातील कोरोना परिस्थितीवर भाष्य केलं. राज्य सरकारने जी नियमावली केली आहे त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरू केलं आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. शाळेत बोलावून विद्यार्थ्यांना लसीकरण केलं जातं आहे. आतापर्यंत 48 टक्के लसीकरण झालंय. जिल्ह्यात इतर जिल्ह्यासारखी परिस्थिती नाही. त 60 वर्षांच्या व्यक्तींचं लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, असं पवार म्हणाले.