बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 ऑक्टोबर 2021 (15:39 IST)

दुसरा डोस घेतलेल्यामध्ये कोरोना होण्याचे प्रमाण जास्त, अजित पवारांनी सांगितले कारण

सीएसआर फंडातून 5 लाख लसींचे डोस उपलब्ध झाले असून प्रत्येक मतदारसंघात 75 तास लसीकरणाचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. पुण्यातील मृत्यूदर 1.7 टक्के इतका झाला आहे. तर पिंपरी चिंचवडचा 1.5 आणि ग्रामीणचा 0.8 इतका मृत्यू दर झाला आहे. मागील आठवड्यात 5 लाख नागरिकांचे लसीकरण झाले असून यामध्ये 5 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी दिली. जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा अजित पवार  यांनी घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ज्या नागरिकांनी पहिला डोस  घेतला आहे त्यांना कोरोना होण्याचे प्रमाण 0.19 टक्के आहे.तर दुसरा डोस घेतल्यानंतर कोरोना होण्याचे प्रमाण 0.25 टक्के असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.अजित पवार पुढे म्हणाले, पहिल्या डोसपेक्षा दुसरा डोस घेतल्यानंतर कोरोना होण्याबाबत डॉक्टरांकडे विचारणा केली.त्यावेळी त्यांनी सांगितले की, आपण दुसरा डोस घेतलाय तर नागरिक मास्क  न घालता फिरत आहेत, स्वत:ची काळजी घेत नाहीत.त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण होत आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन अजित पवार यांनी नागरिकांना केले आहे.
 
सक्रिय रुग्णांमध्ये घट दिसून आली आहे. नॉन कोविड आणि कोविड रुग्णालयांबाबत निर्णय घेण्यात आला आहे.ससून रुग्णालयात 40 टक्के रुग्ण हे अहमदनगर जिल्ह्यातील  असल्याचे समजल्यानंतर नगर, नाशिकच्या  प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.त्याना तुम्हाला काय पाहिजे असेल तर सांगा अशी विचारणा केली. त्यावेळी त्यांनी चाचण्यांसाठी मदत हवी असल्याचे सांगितले.नगर जिल्ह्यातील संगमनेर,पारनेर याठिकाणी रुग्ण वाढत आहेत.याठिकाणी कठोर निर्बंध लागू करा आणि कोरोना संसर्ग रोखा,असे सांगण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.