रेमडेसिवीरची बेकायदेशीररित्या विक्री करणारे तिघे गजाआड
रेमडेसिवीर इंजेक्शनची चढ्या दराने, बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्या तीन जणांविरोधात पुण्यातल्या निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये एका खासगी रुग्णालयाच्या वॉर्डबॉयचाही समावेश आहे. हा प्रकार आकुर्डी येथील एका खासगी रुग्णालयात 23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर या कालावधीत घडला आहे. कोरोना आणि निमोनिया या आजारांवर उपचारासाठी रेमडेसिवीर अत्यावश्यक असलेले इंजेक्शन आहे.
पिंपरी चिंचवडचे रहिवासी मुस्तफा तांबोळी यांच्या आईला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना आकुर्डी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कोरोनावर उपचारासाठी आवश्यक असलेले रेमडेसिवीर हे इंजेक्शन त्यांना मिळत नव्हते. दरम्यान, त्यांना संबंधित रुग्णालयातील एका वॉर्डबॉयने ज्यादा दरात रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करुन दिले.
रेमडेसिवीर इंजेक्शनची खरी किंमत 5 हजार 400 रुपये इतकी आहे. मात्र, मुस्तफा तांबोळी यांना या इंजेक्शनसाठी 14 हजार 500 रुपये मोजावे लागले. मात्र, तरीदेखील मुस्तफा आपल्या आईला वाचवू शकले नाहीत. त्यानंतर मुस्तफा यांच्या एका मित्रासोबतही असाच प्रकार सुरु असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. या घटनेची माहिती मिळताच त्यांनी या प्रकरणाचा भांडाफोड केला.