रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 30 नोव्हेंबर 2021 (08:11 IST)

मंत्र्यांच्या ड्रायव्हरला ४० हजार आणि एसटी कर्मचाऱ्याला १२ हजार पगार हे चुकीचेच; बच्चू कडूंचा घरचा आहेर

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. त्याबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांनी घोषणा करतानाच एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, राज्यातील जवळपास ९० हजारपैकी ७३ हजार एसटी कर्मचारी अद्यापही संपावर ठाम आहेत. एसटीचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण या एकाच मुद्द्यावर एसटी कर्मचारी ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. मंत्र्यांच्या आणि कलेक्टरच्या गाडीच्या ड्रायव्हरला ४० हजार आणि एसटी कर्मचाऱ्याला १२ हजार पगार हे चुकीचंच असल्याचं बच्चू कडू म्हणाले. इस्लामपूरमधील कृषी प्रदर्शन उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
जो एसटी कर्मचारी हजारो लोकांना घेऊन प्रवास करतो, त्याला फक्त १२ हजार पगार मिळत असेल तर ते चुकीचं आहे. आम्ही त्यांच्या बाजूने आहोत. पण आंदोलन करण्याची ही वेळ नाही. आंदोलन मागे घेऊन येणाऱ्या काळात आम्ही त्यांच्यासाठी आंदोलन करू, असं बच्चू कडू म्हणाले. त्याचबरोबर शेतकऱ्यांना जर फक्त ८ तास वीज मिळत असेल आणि पूर्ण बिलाची वसुली केली जात असेल तर ते चुकीचं आहे. सरकार नक्की त्यावर विचार करेल, असंही बच्चू कडू म्हणाले