मोठी कारवाई, लहान मुलींचे अपहरण करून परराज्यात विकणारी टोळी पकडली
लहान मुलींचे अपहरण करून परराज्यात विकणारी टोळी नाशिकच्या ओझर पोलिसांच्या हाती लागली आहे. नाशिकच्या ग्रामीण पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. लहान मुलीचं अपहरण करून परराज्यात विकणारी टोळीच्या गुजरात आणि मध्यप्रदेशमधून पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहे. ओझरमध्ये २ महिन्यात २ मुलींचे अपहरण झाले होते. अपहरणाच्या या घटनांमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती.
ओझर मधील एक महिला पैशांसाठी हे अपहरण करण्याचं काम करायची अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. संशयित महिलेला ओझर पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहे. तर २ महिला आणि २ पुरुष अशा ४ संशयितांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
दरम्यान पोलीसांनी या मोहिमेला ऑपरेशन मुस्कान असं नाव दिलं होतं. अल्पवयीन मुलींना फूस लावून विकणारी टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी ऑपरेशन मुस्कान सुरू करण्यात आलं. या टोळीने दहा ते बारा वयोगटातील मुलींचे अपहरण केलं होतं. संशयितांनी पंचवटी, सातपूर, फुलेनगर या ठिकाणाहून देखील फूस लावून मुलींना पळवून नेण्याची कबुली दिली आहे. ऑपरेशन मुस्कान नुसार ओझर गुन्हे शोध पथकाने पाच दिवस गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये तळ ठोकून या टोळीला गजाआड केले आहे. त्यामुळे अखेर ऑपरेशन मुस्कानला यश आलं आहे. नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक सचिन पाटील यांच्या सहकार्याने ओझर पोलीस गुन्हे शोध पथकाने मोठ्या शिताफीने ही कारवाई केली आहे.
या प्रकरणात ओझरमध्ये दोन महिन्यात दोन मुलींचा अपहरण झालं. त्यामुळे अपहरण करणाऱ्यांची टोळी सक्रिय असल्याचा अंदाज पोलिसांना आला. त्यानुसार पोलीस गुन्हेगारांच्या मागावर होते. पोलिसांना सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही टोळी परराज्यात या मुलींची विक्री करायची. पोलिसांनी शोधचक्रे फिरवून गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये तळ गाठला आणि या ठिकाणहून अपहरण करणारी ही टोळी जेरबंद केली. दरम्यान या प्रकरणात अजून काही धागेदोरे हाती लागतात का, याचा तपास पोलीस करत आहेत.