रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 18 मे 2021 (07:57 IST)

अजित पवार मंत्रालयात आले, पण मुख्यमंत्री कधी येणार?; भाजपचा सवाल

राज्यात निर्माण झालेलं कोरोनाचं संकट आणि गेल्या दोन दिवसांपासून घोंगावणारं तोक्ते वादळाचं संकट या पार्श्वभूमीवर भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयात आले. त्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागातून परिस्थितीची पाहणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्फ फ्रॉम मंत्रालय कधी करणार?, असा सवाल भाजपने केला आहे.
 
भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एकामागोमाग एक असे तीन ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हा सवाल केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वर्क फ्रॉम मंत्रालय कधी करणार?, कोकण, मुंबईवर वादळ आले, सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस, घरे पडली, झाडे कोसळली, रस्त्यांवर पाणी आलं… त्यातच कोरोनाचे संकट, मुख्यमंत्री घरात बसलेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आपत्ती निवारण कक्षात भेट देऊन पाहणी तरी केली. पण, मुख्यमंत्री कधी दिलासा देणार? असा सवाल केशव उपाध्ये यांनी केला आहे.
 
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना गिरगावला मांडवाला आग लागण्याचा घटना अथवा पावसाने मुंबईला झोडपण्याची घटना असो तेव्हा परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत तेथून हालले नव्हते. इथे लोकांना वर्क फ्रॉम होम करा सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी स्वःताच इतकं मनावर घेतलं आहे की राज्यात त्यांच्यासाठी मंत्रालयसुध्दा आहे हे कधी लक्षात येणार?, असा चिमटाही त्यांनी काढला आहे.
 
मुख्यमंत्री ‘वर्क फ्रॉम होम मिनिस्टर’ झाले
महाराष्ट्रात एका होम मिनिस्टरने जनतेचा विश्वास कधीच धुळीस मिळविला आहे. मुख्यमंत्री तर ‘वर्क फ्रॉम होम मिनिस्टर’ झाले आहेत. जनता संकटाशी मुकाबला करत असताना वर्क फ्रॉम होम मिनिस्टरने किमान ‘वर्क फ्रॉम मंत्रालय’ तरी करून दाखवावे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
 
अजित पवारांकडून पाहणी
दरम्यान, राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तौत्के वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  सकाळी मंत्रालयातील आपत्कालिन व्यवस्थापन आणि नियंत्रण कक्षास भेट दिली. यावेळी त्यांनी राज्यातील वादळ परिस्थितीचा, बचाव आणि मदतकार्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी तसेच मुंबई महापालिका आयुक्तांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून चर्चा केली.