गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 जानेवारी 2023 (09:33 IST)

आनंद दिघें जयंती 2023 : आनंद दिघेंची 'ती' रिकामी खुर्ची आजही शिवसेनेच्या शाखेत आहे कारण ...

anand dighe
"शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद चिंतामणी दिघे यांना आजही आम्ही वडिलांच्या जागी मानतो. ती एक व्यक्ती नव्हती तर एक संस्थान होतं. त्यांनी अनेक लोकांचे उद्ध्वस्त होणारे संसार वाचवले; मुलांची शिक्षण केली; तरूणांना नोकर्‍या मिळवून दिल्या; अनेकांची आजारपणं काढली त्यांना मदत केली. सामान्य माणसांची सगळी कामं ते करायचे.
 
"स्वतःच घरदार सोडून ते लोकांची कामं करायचे. पण त्यांनी स्वतः कधीच निवडणूक लढवली नाही. ते लोकनेते होते. आजही त्यांनी केलेल्या समाजकार्यासाठी ते लोकांच्या लक्षात आहेत. त्यासाठी आम्ही ठाण्यात त्यांना सर्वोच्च जागी मानतो. यासाठी आम्ही त्यांची खुर्ची टेंभी नाक्याच्या शाखेत तशीच ठेवली आहे," टेंभी नाक्याचे शिवसेनेचे शाखाप्रमुख हेमंत पवार सांगत होते.
 
टेंभी नाक्याच्या शाखेत आजही आनंद दिघे यांची खुर्ची तशीच ठेवली आहे. शिवसेनेचे नेते आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे जेव्हाही या शाखेत येतात त्यावेळी ते बाजूच्या खुर्चीत बसतात.
 
आनंद दिघे यांच्या निधनानंतर त्या खुर्चीवर बसण्याची हिंमत कधीही कोणी केली नाही आणि भविष्यातही करणार नाहीत, कारण त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही अशी भावना तिथल्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.
 
आनंद दिघे धर्मवीर कसे झाले?
आनंद दिघे यांचा जन्म 27 जानेवारी 1952 मध्ये झाला. ठाण्याच्या टेंभी नाका परिसरात त्यांचं घर होतं. त्यांच्या घरी आई, वडील, बहीणी आणि भाऊ असा परिवार होता.
 
बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाने आनंद दिघे प्रभावित झाले. 1980 च्या दशकांत ठाणे हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला बनला होता. तिथे भगवा फडकवून लोकांसाठी काम करायला आनंद दिघे यांनी सुरूवात केली होती.
आनंद दिघेंच्या कामाची पद्धत बघून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिघेंवर जिल्हाप्रमुखाची जबाबदारी सोपवली. त्यानंतर त्यांनी घर परिवार सोडून लोकांची कामं करण्यात स्वतःला वाहून घेतले. सकाळपासून ते पहाटे 3-4 पर्यंत ते कधीकधी शाखेत असायचे असं शिवसैनिक सांगतात.
देव - धर्माचं ते खूप करत असतं. रोज पूजा झाल्याशिवाय कामाला सुरुवात करत नसत. नवरात्र, गणेशोत्सव, शिवजयंती खूप जोरदार साजरी होत असे.
 
अनेक धार्मिक कार्यक्रमात ते आवर्जून भाग घेत असतं. साधू-संत त्यांच्या आनंद आश्रमातून उपाशी जात नसत. त्यातून त्यांची लोकप्रियता वाढत गेली. मग कालांतराने 'धर्मवीर' म्हटलं जाऊ लागलं.
 
शिक्षणावर विशेष प्रेम होतं?
आनंद दिघे यांच्या घरची परिस्थिती फार बरी नसल्याने त्यांना कॉलेजचं शिक्षण मध्येच सोडावं लागलं होतं.
 
मुलांनी शिकलं पाहीजे यावर त्यांचा अधिक भर होता. वाडा-मोखाडा या भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांची यादी ते मागवून घ्यायचे आणि त्यांना मोफत वह्या-पुस्तके पुरवायचे. दहावी सराव परीक्षा प्रशिक्षण हे सर्वप्रथम ठाण्यात आनंद दिघे यांनी सुरू केलं. ते आजही सुरू आहे.
त्यानंतर शिवसेनेने इतर ठिकाणीही ही संकल्पना अमलात आणली. स्वयंरोजगारासाठी महिलांना स्टॉल उभे करून दिले. त्यांच्या कामामुळे ते लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवू लागले.
 
प्राध्यापक प्रदिप ढवळ सांगतात, "मी ज्ञानसाधना कॉलेजला लेक्चरर होतो. त्यावेळी सतत 15-17 वर्षं माझा त्यांच्याशी संपर्क यायचा. गरीब-वंचित विद्यार्थी ज्यांच्याकडे डोनेशन भरायला पैसे नसायचे त्यांना ते स्वतः घेऊन यायचे. त्यांचे प्रवेश करून द्यायचे. एकदा एक महिला दोन-तीन रूपयांची नाणी जमा करून चार हजार रूपये घेऊन आली होती. ती विनंती करत होती की, मी खूप कष्टाने हे पैसे जमा केले आहेत.
 
"हे घ्या आणि माझ्या मुलीला प्रवेश द्या. तेव्हा प्रवेश देणं शक्य नव्हतं. कारण सगळ्या जागा भरल्या होत्या. त्यावेळी योगायोगाने तिथे आनंद दिघे आले तिथे आले. त्यांनी ती परिस्थिती पाहिला आणि मला म्हटलं हा प्रवेश काहीही करून झाला पाहिजे. या मुलीच्या शिक्षणाचा सर्व खर्च मी करेन. आमच्या कॉलेजला जागा भरलेल्या असतानाही त्यातून मार्ग काढून तो प्रवेश करून घ्यायला लागला होता".
 
लहान मुलांनी मोर्चा काढला
शिवसेनेचे कार्यकर्ते आनंद दिघेसमोर जायला घाबरतं असत, असं अनेक जुने शिवसैनिक सांगतात. त्यांच्यासमोर 'चुकीला माफी नव्हती'. काही चुकलं तर कार्यकर्त्यांना अनेकदा सर्वांसमोर मारायचे. त्यामुळे त्यांच्यासमोर बोलायला अनेक कार्यकर्ते घाबरायचे.
1989 साली ठाण्यात महापौर निवडीची जबाबदारी बाळासाहेब ठाकरे यांनी आनंद दिघेंवर सोपवली होती. प्रकाश परांजपे हे तेव्हाचे शिवसेनेचे उमेदवार होते. पण या निवडणुकीत एका मताने प्रकाश परांजपे हरले. यामध्ये शिवसेनेचं मतं फुटल्याची चर्चा होती. बाळासाहेब ठाकरेंनी 'गद्दार' कोण आहे हे शोधण्यास सांगितले.
 
तत्कालीन नगरसेवक श्रीधर खोपकर यांचं मत फुटलं आणि त्यामुळे शिवसेनेला पराभव स्वीकारावा लागला अशी चर्चा सुरू झाली. त्यानंतर महिन्याभरातच श्रीधर खोपकर यांचा खून झाला. याप्रकरणी आनंद दिघे यांच्यावर 'टाडा' कायद्याअंतर्गत अटक केली.
 
प्राध्यापक प्रदीप ढवळ सांगतात, "आनंद दिघे लहान मुलांमध्ये दिघे काका म्हणून प्रसिद्ध होते. आई-वडील ओरडले की, दिघे काकांना सांगेन असं म्हणायचे. आनंद दिघेही त्यांच्यात क्रिकेट वगैरे खेळायचे. त्यांना अटक झाल्यानंतर या लहान मुलांनी दिघे काकांना सोडा म्हणून ठाणे आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला होता. लहान मुलांनी एखाद्या नेत्यासाठी काढलेला हा पहिला मोर्चा असू शकेल. "
ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ सांगतात, "आज आनंद दिघे यांना जाऊन 21 वर्षे झाली. त्यांच्याबद्दल वादाचे मुद्दे आहेत. पण त्यांनी केलेलं समाजकार्य हे प्रत्यक्ष लोकांनी अनुभवलं आहे म्हणून त्यांचं नाव आजही आदाराने घेतलं जातं. "
 
Published By- Priya Dixit