शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 एप्रिल 2021 (23:09 IST)

पालकमंत्री यांना नगर जिल्ह्यात घेऊन येणार्‍यास पाच हजार रुपयाचे बक्षिस जाहीर

अहमदनगरमध्ये कोरोनाने जिल्ह्याची परिस्थिती गंभीर झाली असताना, पालकमंत्री तोंड दाखविण्यास तयार नसल्याचे आरोप करुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना जिल्ह्यात घेऊन येणार्‍यास पाच हजार रुपयाचे बक्षिस जाहीर करण्यात आले.
 
तर मुंबई, कोल्हापूरला जाणार्‍या एसटी बस, लक्झरी आणि शहरातील प्रवासी वाहनांना पालकमंत्री यांना जिल्ह्यात घेऊन येणार्‍यास पाच हजार रुपयाचे बक्षिसाचे पत्रक चिकटविण्यात आले.
मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ व शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर यांच्या सुचनेनूसार नितीन भुतारे यांच्या नेतृत्वाखाली हे अनोखे आंदोलन इंपिरीयल चौकातील पुणे बस स्थानक व शहरातील प्रमुख चौकात करण्यात आले.
 
ऑक्सीजन व रेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. या संकटकाळात प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्या जिल्ह्यात योग्य नियोजन करीत आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्यात रुग्णांचे नातेवाईक सुविधा मिळत नसल्याने रस्त्यावर येत आहे.
 
पालकमंत्री हसन मुश्रीफ कोरोनाची गंभीर परिस्थिती उद्भवली असताना जिल्ह्यात येण्यास तयार नाही. ते कधीतरी येऊन अधिकार्‍यांची बैठक घेतात, नियोजन न करता निघून जातात. उंटावरुन शेळ्या हाकण्याचे काम पालकमंत्री करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तर दररोज नगरमध्ये चाळीस ते पन्नास नागरिक कोरोनाने मृत्यूमुखी पडत असताना, मुंबई व कोल्हापूरला जाणार्‍या नागरिकांनी पालकमंत्री दिसल्यास त्यांना नगरमध्ये घेऊन येण्याचे आवाहन केले.