शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 जुलै 2022 (21:00 IST)

विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू : शरद पवार

sharad pawar
जगामध्ये जिथे – जिथे हुकुमशाही आली, ती लयास गेली. श्रीलंकेत राष्ट्रपतींच्या घरात सामान्य लोकं घुसली आणि सत्ताधारी कुटुंब देशाबाहेर निघून गेले आहे. त्यामुळे सत्तेचा गैरवापर कुणी करत असेल तर लोकं त्याविरोधात आवाज उठवतात, हे श्रीलंकेत दिसून आले असा इशारा देतानाच भारतातही जे काही घडत आहे, त्याची चिंता न करता आपण एकसंध राहिले पाहिजे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी नागपूर येथे केले. लोकशाही टिकवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आदर्श घालून दिला आहे. हा आदर्श टिकवण्यासाठी आपल्याला एका जबरदस्त संघटनेची आवश्यता आहे आणि ती संघटना राष्ट्रवादी काँग्रेस आहे असा आत्मविश्वासही शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नागपूर येथील कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थित राहून आदरणीय शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.
 
आम्ही केंद्रसरकारच्या हुकुमशाही विरोधात सातत्याने आवाज उठवत आहोत. त्याची जबरदस्त किंमत आमच्या नवाब मलिक व अनिल देशमुख या दोन सहकाऱ्यांना मोजावी लागली आहे असे सांगतानाच शरद पवार यांनी  ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे, त्यांनी सत्ता केंद्रीत करुन विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचा आरोपही केला.
 
मध्यप्रदेशमध्ये कमलनाथ यांचे राज्य पाडून भाजपचे राज्य आणले. कर्नाटकात देखील आमिषे दाखवून काँग्रेसचे सरकार घालवले. त्यानंतर महाराष्ट्रात शिवसेनेचे काही लोक हाताशी धरून राज्यात चांगले काम करणारे सरकार बाजूला केले.आज ठिकाठिकाणी अधिकारांचा गैरवापर केला जातोय, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. पण हे जास्त काळ चालणार नाही असा स्पष्ट इशाराही शरद पवार यांनी भाजपला दिला.