बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

चांगली बातमी : निवृत्तीवेतनधारकाचे निवृत्तीवेतन संयुक्त खात्यात जमा करण्यास मान्यता

निवृत्तीवेतनधारकांचे मासिक निवृत्तीवेतन जमा करण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांना संयुक्त बँक खाते उघडण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. या खात्याद्वारे केवळ निवृत्तीवेतनधारक हयात असेपर्यंत त्याला किंवा तिला मासिक निवृत्तीवेतनाची रक्कम प्रदान करण्यात येते.
 
निवृत्तीवेतनधारकांच्या निधनानंतर कुटुंब निवृत्तीवेतनधारकास स्वतंत्र निवृत्तीवेतन खाते उघडावे लागत असे. कुटुंब निवृत्तीवेतनधारकांचा हा त्रास कमी करण्याच्या उद्देशाने आता या पद्धतीत सुधारणा करण्यात आली  आहे. निवृत्तीवेतनधारकाच्या निधनानंतर कुटुंब निवृत्तीवेतनधारकाला नवीन  बँक खाते उघडण्याची गरज नाही. त्यांना आवश्यक त्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून योग्य त्या कार्यवाहीनंतर त्यांच्या पूर्वीच्या संयुक्त खात्याद्वारेच कुटुंब निवृत्तीवेतन प्रदान करण्यात येईल. यासंबंधीचा शासन निर्णय वित्त विभागाने 14 नोव्हेंबर 2019 रोजी निर्गमित केला आहे.
 
परंतु ज्या प्रकरणात निवृत्तीवेतनधारकाने संयुक्त बँक खाते उघडलेले नसेल त्या प्रकरणी कुटुंब निवृत्तीवेतनधारकाने स्वतंत्र बँक खाते उघडणे अनिवार्य करण्यात आले आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक 201911141536341105 असा आहे.