शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 5 मे 2022 (15:19 IST)

सिंधुदुर्गात दुर्मीळ ‘देव जांभुळ’ वनस्पतीचे अस्तित्व

Dev Jambul
सिंधु-सहय़ाद्री ऍव्हेंचर क्लबतर्फे आंबोलीतील कावळेसाद दरीत प्रथमच पार पडलेल्या जैवविविधता संशोधन उपक्रमात सहभागी झालेले प्रसिद्ध वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण गावडे यांना ‘देव जांभुळ’ या स्थानिक नावाने ओळखल्या जाणाऱया दुर्मीळ औषधी वनस्पतीचा शोध लागला आहे. महाराष्ट्रातील सहय़ाद्रीच्या दक्षिण भागात तुरळक ठिकाणी सापडणाऱया या वनस्पतीचे सिंधुदुर्गात प्रथमच अस्तित्व आढळून आले आहे.
 
सिंधुदुर्गातील वनस्पती आणि फुलांवर आजपर्यंत अनेक संशोधने झाली, संदर्भ ग्रंथ लिहिले गेले. मात्र यापैकी कुणालाही ‘देव जांभुळ’या वनस्पतीचे अस्तित्व सापडले नव्हते. या नव्या शोध मोहिमेने सिंधुदुर्गच्या वनस्पती संदर्भ ग्रंथात ‘देव जांभूळ’ची नोंद घालण्याचा बहुमान डॉ. गावडे यांना प्राप्त झाला आहे.
 
1988 मध्ये डॉ. बी. जी. कुलकर्णी यांनी ‘फ्लोरा ऑफ सिंधुदुर्ग’ प्रकाशित केला होता. तर 1990 मध्ये डॉ. सारामा आल्मेडा यांनी ‘फ्लोरा ऑफ सावंतवाडी’ प्रकाशित केला होता. पण दोघांनाही या वनस्पतीचा शोध सिंधुदुर्गातून घेता आला नव्हता. सोळाव्या शतकाच्या मध्यापासून ते आजमितीपर्यंत आंबोलीतील कावळेसाद ही दरी वनस्पती सर्वेक्षणापासून वंचित राहिली होती. ख्यातनाम गिर्यारोहक रामेश्वर सावंत यांच्या नेतृत्वाखाली ‘सिंधु-सहय़ाद्री ऍडव्हेंचर क्लब’या संस्थेच्या माध्यमातून प्रथमच कावळेसादच्या दरीत वनस्पती व प्राणी शास्त्रज्ञांना घेऊन जैवविविधता संशोधन मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेतून सर्वप्रथम ‘देव जांभुळ’ या वनस्पतीचा शोध लागला.
 
‘देव जांभुळ’ ही वृक्षवर्गीय वनस्पती असून ती साधारणपणे 10 मीटर उंचावर वाढते. याच्या खोडावरील साल राखाडी-पांढरट रंगाची, गुळगुळीत असून फांद्या सडपातळ असतात. या वनस्पतींना येणारी फुले ही द्विलिंगी असून चार ते पाच सेमी व्यासाची, पांढऱया किंवा लाल रंगाची असतात. दोन ते पाचच्या संख्येने झाडाच्या खोडावर गुच्छाप्रमाणे उमलतात. या वनस्पतीची फुले व फलधारणा डिसेंबर ते जुलै या कालावधीत होते. या वनस्पतीवर यापूर्वी झालेल्या संशोधनातून असे निदर्शनास आले आहे की, या वनस्पतीच्या सालीत उपयुक्त रासायनिक घटक आढळत असून यामध्ये सुक्ष्मजीव रोधक व बॅक्टेरिया वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म आढळून आले आहेत.