शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 22 ऑक्टोबर 2022 (21:22 IST)

सर्वप्रथम १२ आमदार पळून गेले, ते कसं कळलं? आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदाच उलगडला सर्व घटनाक्रम

aditya thackeray
मुंबई – जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मोठं सत्तानाट्य होऊन सत्तांतर झालं. २९ जून रोजी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला अन् दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी एकनाथ शिंदेंनी भारतीय जनता पार्टीच्या समर्थनाच्या आधारे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र या सर्व सत्तानाट्यादरम्यान उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या समर्थनासाठी जाणाऱ्या आमदारांना का नाही थांबवलं असा प्रश्न अनेकदा चर्चेत आला. या प्रश्नाला उद्धव यांचे पुत्र आणि युवासेनेचे नेते आदित्य ठाकरेंनी उत्तर दिलं आहे.
 
आदित्य ठाकरेंनी आम्ही शिंदेंवर डोळे झाकून विश्वास ठेवण्याची चूक केली असं विधान केलं आहे. याचविषयी पुढे बोलताना त्यांनी बंडखोरांना न रोखण्याच्या निर्णयामध्ये उद्धव ठाकरेंनी नेमकं काय कारण दिलं हे सुद्धा सांगितलं. “बारा लोक गेले तेव्हा मला उद्धवसाहेबांनी सांगितलं की, आदित्य यांच्यामागे आपण पोलीस वगैरे लावून काही उपयोग नाही. स्वत:ला विकलेले हे लोक आज नाहीतर उद्या निघून जाणार आहेत. ते पैशाला विकले गेलेले आहेत,” असं आदित्य ठाकरेंनी एका मुलाखतीत म्हटलं आहे.
 
ठाकरे पुढे म्हणाले की, यांच्यामागे लागून काय करायचं, यांच्यावर काही दडपण असेल. त्यांनी काही गैर केलं असेल अथवा लोकांबरोबर काही चुकीचं केलं असेल याचं दडपण असेल तर ते निघून जाणारच आहेत. स्वत:ला विकलं असेल तर निघून जाणार आहेत. यांना किती दिवस रोखायचं आणि का म्हणून रोखायचं? आपण काही चुकीचं केलेलं नाही आपण जनतेसमोर जाऊ. आपण जनतेमध्येच आहोत. आपला चेहरा लोकांना ठाऊक आहे,” असंही सांगितल्याचं आदित्य म्हणाले.
तसेच शिंदे गटातील आमदारांना टोला लगावताना आदित्य यांनी, “हे मुखवटे लावून फिरत होते आणि अजून मुखवटे लावून फिरत आहेत. अनेक वेगवेगळी कारणं देतात. हिंदुत्वापासून, काँग्रेस, राष्ट्रवादीपासून निधीपासून सगळी कारणं देत असतात. ते पळून गेले आहेत. आम्ही इथेच आहोत. आता बघू,” असंही म्हटलं.
 
अशी लागली सत्तांतराची चाहूल
महाविकास आघाडीमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागल्याच्या रात्रीच बंडखोरी करुन सुरतला निघून गेले. १२ आमदारांसहीत शिंदे सुरतला गेल्याची बातमी म्हणून झळकली आणि राज्यात राजकीय भूकंप होणार याची पहिली चाहूल लागली. त्यानंतर अपात्रतेसंदर्भातील आदेश, या आमदारांची समजूत काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी पाठवलेली नेते मंडळी, नाराजी नाट्य, गुवाहाटी प्रकरण आणि आठवडाभराच्या आरोप प्रत्यारोपानंतर बंडखोर गटात ४० शिवसेना आमदार आणि १० अपक्ष आमदार सहभागी झाल्याने अल्पमतात आलेलं ठाकरे सरकार पडलं.

Edited by : Ratnadeep Ranshoor