कणकवलीतील हल्ला प्रकरणी चारजणांना अटक; कोकणातील राजकारण तापले
जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक संतोष परब यांच्यावर हल्ला करणार्या चौघा हल्लेखोरांना कारसह पोलिसांनी पकडले असून हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्याची कबुली दिली आहे. संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यात वापरलेली इनोव्हा कार (MH 14 – BX 8326) फोंडाघाट चेकपोस्टवर पोलिसांनी पकडली. त्यानंतर आतील चारही संशयितांना ताब्यात घेत ओरोस पोलीस स्टेशनला आणण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी चारही आरोपींची बंद दरवाजाआड कसून चौकशी केल्याचे समजते. मात्र, चौकशीचा तपशील समजू शकलेला नाही. दरम्यान, पोलिसांनी कणकवली हल्ल्यामागील सूत्रधार शोधावा अशी मागणी माजी गृहराज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी केली आहे.
परब वरील हल्ला हा आमदार नितेश राणे, माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या सांगण्यावरून भाडोत्री गुंडांनी केल्याचा आरोप जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केला होता. पालकमंत्री उदय सामंत यांनी जखमी परब यांची विचारपूस केली होती. या हल्ल्याची दखल थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली. त्यातच खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी राणेंच्या दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. तर आमदार नितेश राणे यांनी परब यांच्यावरील हल्ला हा पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत आणि खासदार विनायक राऊत यांच्यातील राजकीय वादातून झाल्याचे सांगितले.
सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या चार नगरपंचायत निवडणुका आणि जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान, चारही आरोपींना कोर्टात हजर केले असता त्यांना २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हल्ल्यामागील सूत्रधार शोधावा : केसरकर
काँग्रेसमध्ये असताना नारायण राणे यांनी तत्कालीन काँग्रेस तालुकाध्यक्षाच्या नावावर घेतलेल्या बोलोरो गाड्यांच्या कर्ज प्रकरणी तत्कालीन सिंधुदुर्ग जिल्हा बॅक अध्यक्ष राजन तेली यांची ठाणे पोलीसाच्या अर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला असून हा तपास सिंधुदुर्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र हा तपास राज्याच्या स्तरावर केला जावा तसेच पोलिसांनी कणकवली हल्ल्यामागील सूत्रधार शोधावा अशी मागणी राज्याचे माजी गृहराज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी केली आहे. ते सावंतवाडीत पत्रकार परिषदेत बोलत होते.