बाहेर आले तर चप्पल चोरीला… गिरीश महाजनांनी उडवली एकनाख खडसेंची खिल्ली
एकनाथ खडसे मंदिरात प्रसाद खाण्यासाठी गेले तर प्रसाद संपून जातो आणि बाहेर आल्यावर चप्पल चोरीला जाते, अशी स्थिती असल्याचे सांगत भाजप नेते गिरीश महाजन यांनीखडसेंची खिल्ली उडवली आहे. खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. मात्र त्यानंतर लगेचच शिवसेनेत बंडखोरी होऊन सत्तापरिवर्तन झाले आहे. त्यामुळेच खडसेंच्या सद्यस्थितीवर सोशल मीडियावर जोरदार विनोद केले जात आहेत.
गिरीश महाजन हे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, एकनाथ खडसे मंदिरात गेले तर प्रसाद संपतो, अशी स्थिती आहे. ते बाहेर आल्यावर चप्पल चोरीला जाते. सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होतात, याला मी योगायोग म्हणेन, असे ते म्हणाले. एकनाथ खडसे यांच्यामुळेच हा अनर्थ घडला असे मी म्हणणार नाही, मात्र सोशल मीडियावर असे बोलले जात आहे. मात्र हा योगायोग असल्याचे महाजन म्हणाले. राजकारणात सत्तेचे संक्रमण सुरूच असते.
विशेष म्हणजे एकनाथ खडसे पूर्वी भाजपमध्ये होते. नुकतेच ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना विधान परिषदेवर उमेदवारी देण्यात आली. येथे ते निवडून आले. मात्र शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यामुळे खडसेंना पुन्हा एकदा विरोधी पक्षात बसावे लागले आहे. जर महाविकास आघाडी सरकार असते तर त्यांना मंत्रीपद दिले जाणार असल्याचे सांगितले जात होते. आता खडसेंच्या सद्यस्थितीवर गिरीश महाजन यांनी खडसे यांच्यावर ही टीका केली आहे.