प्रभाकर साईल मृत्यू प्रकरणी चौकशीचे आदेश
कॉर्डेलिया क्रूझ ड्रग प्रकरणात शाहरुख पुत्र आर्यनला अटक केल्यानंतर चर्चेत आलेले एनसीबीचे पंच साक्षीदार प्रभाकर साईल यांचा मृत्यू झाला. हा मृत्यू नसून घातपात असल्याचा देखील संशय व्यक्त केला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने तर याबद्दल सीआयडी चौकशीची देखील मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस महासंचालकांना चौकशी करण्यासंबंधी आदेश दिले आहेत.
“ही अतिशय अचानक घडलेली घटना आहे आणि यासंदर्भात निश्चितप्रकारे संशय निर्माण होण्यासारखी परिस्थिती आहे. या संदर्भात राज्याच्या पोलीस महासंचालकांना चौकशी करण्यासाठी मी आदेश दिलेले आहेत.”
अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. तर, प्रभाकर साईल यांचा मृत्यू काल त्यांचे चेंबूर येथील माहुल भागातील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याची माहिती त्यांचे वकील वकील तुषार खंदारे यांनी दिली आहे.