मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 एप्रिल 2022 (21:38 IST)

महाराष्ट्र राज्य देशाच्या अर्थव्यवस्थेचा मोठा आधार : मुख्यमंत्री

वस्तू आणि सेवा कर विभाग हा राज्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून देशाच्या एकूण उत्पन्नात सर्वाधिक योगदान देणारे महाराष्ट्र राज्य हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा मोठा आधार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे केले.
 
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री तथा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली वडाळा येथे वस्तू आणि सेवा कर भवनाच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन झाले. त्यावेळी बोलताना ठाकरे यांनी वस्तू आणि सेवा कर विभागाची ही इमारत इतकी देखणी व्हावी की ती पाहण्यासाठी नागरिकांनी येथे यावे. देशातील वस्तू आणि सेवा कर भवनाच्या इमारतींमध्ये ती सर्वोत्कृष्ट ठरावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
 
वस्तू आणि सेवा कर भवनाच्या इमारतीच्या भूमिपूजनाचे श्रेय उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे असून त्यांच्या पाठपुराव्यामुळेच सगळ्या परवानग्या मिळवून आज त्याचे काम सुरु होत आहे. इमारतीचे संकल्पचित्र अप्रतिम आहे. कोणतेही संकल्प पूर्ण करायला राज्याच्या तिजोरीत ‘अर्थबळ’ लागते ते वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून मिळत असल्याने राज्य अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा हा विभाग भक्कम झालाच पाहिजे. कर संकलनात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असल्याची बाब अभिमानास्पद आहे. आज भूमिपूजन होत असलेली वास्तू पर्यावरणपूरक असून ती २०२५ पर्यंत बांधून पूर्ण होईल, अशी माहिती ठाकरे यांनी दिली.
 
जो करदाता येथे कर भरण्यासाठी येईल त्याला आपण भरलेला कर राज्य विकासाच्या कामात योग्य पद्धतीने वापरला जात असल्याची खात्री मिळेल अशी ही इमारत असावी अशी अपेक्षाही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.