बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 28 ऑक्टोबर 2021 (16:10 IST)

क्रांती रेडकरचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र, योग्य तो न्याय मिळावा अशी केली मागणी

NCBचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर हिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. मला योग्य तो न्याय मिळावा, अशी मागणी तिने या पत्रात केली आहे. माझ्या कुटुंबाची नाहक बदनामी सुरु आहे, असे तिने पत्रात म्हटले आहे.
 
दरम्यान, क्रांती रेडकर हिने शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना फोन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. पण अद्याप त्यांना भेटीची वेळ मिळालेली नाही. क्रांती रेडकर हिने तिचे म्हणणं मुख्यमंत्र्यांना भेटून सांगायचे आहे. त्यासाठी तिने मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे.
 
तिने पत्रात म्हटले आहे, मी लहानपणापासून मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठी झाली आहे. मी एक मराठी मुलगी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊनच मी वाढले. कुणावर अन्याय करु नये आणि आपल्यावर होणारा अन्याय सहन तर मुळीच करु नये, हे या दोघांनी शिकवले. तोच धडा गिरवत आज मी एकटीने माझ्या खासगी जीवनावर हल्ला करणाऱ्या उपद्रवी लोकांविरोधात ठामपणे उभी आहे. लढते आहे. 
 
सोशल मीडिया, त्यावरचे लोक फक्त मजा बघत आहेत. मी एक कलाकर आहे. राजकारण मला कळत नाही. आमचा काहीही संबंध नाही. मला त्यात पडायचे नाही. आमचा काहीही संबंध नसताना रोज सकाळी आमची बदनामी करण्यात येत आहे. शिवरायांच्या राज्यात एका स्त्रीचा टीका करुन खेळ करण्यात येत आहे. माझ्यावर होणारे खासगी हल्ले बाळासाहेब ठाकरे यांनी खपवून घेतले नसते. मला खात्री आहे. मला न्याय मिळेल. माझ्यावर तुम्ही अन्याय होऊ देणार नाहीत. तुमच्याकडून मला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. तुम्ही योग्य न्याय करा, असे तिने पत्रात म्हटले आहे.