रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 24 ऑगस्ट 2022 (12:03 IST)

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या आमदारात धक्काबुक्की, एकमेकांच्या अंगावर धावले

विधिमंडळ पायऱ्यांवर आता राष्ट्रवादी आणि शिंदे गटाच्या आमदारांमध्ये हमरी-तुमरी आणि धक्काबुक्की झालेली पाहायला मिळाली. शिंदे गटातील आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये धक्काबुक्की झाली.
 
बुधवारी विधिमंडळाचं कामकाज सुरू झालं त्यावेळी पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात धक्काबुक्की झाली. सुरुवात त्यांनी केली असा आरोप राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी सांगितलं.
 
विधान भवनाच्या पायऱ्यांवर  धक्काबुक्की झाल्यानंतर अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. सुरुवातीला महेश शिंदे यांनी शिवीगाळ केल्याची तक्रार अमोल मिटकरी यांनी केली आहे. विधान भवनाच्या पायऱ्यांवर अमोल मिटकरी आणि महेश शिंदे एकमेकांमध्ये भिडले होते. मिटकरी यांनी सत्ताधारी आमदारांनी धमकावलं असल्याचं देखील म्हटलं आहे. 
शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले म्हणाले की, आमच्यावर विरोधक आरोप करत होते. आता आम्ही त्यांच्या भ्रष्टाचारावर आवाज उठवण्यासाठी पायऱ्यावर आंदोलन केलं. आम्ही कुणाला पाय लावत नाही. आम्हाला कुणी पाय लावत असेल तर आम्ही सोडणार नाही. कुणी अंगावर आलं तर आम्ही शिंगावर घेऊ, असं ते म्हणाले. आम्ही कुणाच्या आत जात नाहीत, आमच्या आत कुणी येऊ नये, असं गोगावले म्हणाले. त्यांनी आम्हाला धक्काबुक्की नाही केली, आम्ही त्यांना धक्काबुक्की केली, असंही गोगावले म्हणाले. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, आम्ही डरपोक  नाहीत, कोणालाही घाबरणार  नाही असं ते म्हणाले.गोंधळ घालण्याची त्यांची मानसिकता होती. मीडियाचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करायचा. आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत. त्यामुळे जशास तसं उत्तर दिलं. त्यांनी आमचा नाद करू नये", असं शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी सांगितलं.
 
"आम्ही कुणाला पाय लावत नाही. चुकून पाय लागला तर नमस्कार करतो. पण आम्हाला कोणी पाय लावायचा प्रयत्न केला तर आम्ही सोडणार नाही. जो येईल अंगावर, त्याला घेऊ शिंगावर", असा इशारा गोगावले यांनी दिला.