अनैतिक संबंधातून तरुणाचा खून – दोघे अटकेत एक फरार
एकतर्फी प्रेमातून पत्नीला सतत कॉल करुन अश्लिल संवाद साधणा-या तरुणाचा संबंधीत विवाहितेच्या पतीने गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. मयत तरुणाचा मृतदेह आरापूर शिवारातील एका विहीरीत आढळून आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. विकास रावसाहेब थोरात (रा. टाकळी कदीम ता. गंगापूर) असे विहीरीत आढळून आलेल्या मृत तरुणाचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाअंती विवाहितेचा पती संजय बाबूराव थोरात (37), त्याचा मेहुणा बाळू माणिक नितनवरे (रा. क्रांतीनगर) व भाचा अनिकेत सुधाकर आव्हाड (21) रा. कदीम टाकळी यांची नावे निष्पन्न केली आहे. संजय (पती) व अनिकेत (भाचा) या दोघांना अटक करण्यात आली असून मेहुणा बाळू नितनवरे हा फरार आहे.
विकास थोरात हा तरुण गेल्या 9 जुलैपासून बेपत्ता होता. आरापूर शिवारातील एका शेतात असलेल्या विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आल्यामुळे परिसरात खळबळ माजली. 14 जुलै रोजी त्याचे वडील रावसाहेब थोरात यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सिल्लेगाव पोलिस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. विकासचा चेहरा, डोके, गुप्तांगावर हल्लेखोरांनी जबर मारहाण केल्याचे आढळून आले होते. पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या निर्देशाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भागवत फुंदे यांनी तपासाला सुरुवात केली. संजय व अनिकेतने हा खूनाचा प्रकार केल्याचे तपासात उघड झाले. पोलिस पथकाने दोघांना ताब्यात घेत त्यांना पोलिसी हिसका दाखवला असता संजयने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.विकास थोरात हा गेल्या काही दिवसांपासून पत्नीला मोबाइलवर फोन करत अश्लील संवाद बोलत असल्याचे अटकेतील संजय थोरात याने पोलिसांजवळ कबुल केले आहे. पत्नीने त्याला फोन करु नको असे बजावले होते. मात्र मयत विकास हा ऐकुन घेत नव्हता. त्यामुळे मेहुणा बाळू नितनवरे व भाचा अनिकेत आव्हाड यांच्या मदतीने त्याचा काटा काढण्यात आल्याचे संजय थोरात याने म्हटले आहे.
9 जुलैच्या सकाळी नऊ वाजता विकास थोरात कामावर जाण्यासाठी समृद्धी रस्त्याने जात होता. त्यावेळी गावापासून काही अंतरावरील एका मळ्याजवळ तिघांनी त्याची वाट अडवली. तू माझ्या पत्नीला फोन का करतो? असे त्याला खडसावत विचारले असता त्याने तेवढ्याच उर्मटपणे उत्तर दिले होते. तुम्हाला काय करायचे ते करा, मात्र मला काही झाल्यास माझ्या घरचे तुमचेच नाव घेतील, असे त्याने तिघांना धमकावले. त्याच्या अशा बोलण्यामुळे वाद वाढत गेला. अखेर संतापाच्या भरात संजयने त्याचा दोरीने गळा आवळला. अनिकेतने त्याला दगडाने मारहाण केली. बाळूने थेट त्याच्या गुप्तांगावर लाथांनी मारहाण केली. या मारहाणीत विकासचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर तिघांनी मिळून विकासचा मृतदेह एका गोणीत टाकला. ती गोणी तिघांनी मिळून एका तारेने बांधली. त्यानंतर ती गोणी एका मळ्यात लपवली. बाळू तेथेच थांबला होता तर अनिकेत कार घेऊन निघाला. संजयने विकासची दुचाकी लासूर परिसरात पार्क केली. पुन्हा मळ्यात येऊन विकासचा मृतदेह कारमध्ये टाकून लासूर स्टेशननजीक आरापूर शिवारात नेण्यात आला. तेथेच त्याच्या मृतदेहाला दगड बांधून विहिरीत टाकून देण्यात आला.
या घटनेचा शिल्लेगाव व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात तपास लावत दोघांना ताब्यात घेण्यात यश मिळवले. विहीरीत आढळलेल्या मयताच्या खिशातील आधार कार्डवरुन त्याची ओळख पटली होती. तो विकास रावसाहेब थोरात (25), रा.कदीम टाकळी, ता.गंगापूर असल्याचे निष्पन्न झाले होते. मयत विकास थोरात हा समृद्धी महामार्गाचे काम करत असलेल्या एल अँड टी कंपनीत कामाला होता. चार दिवसापूर्वी मयत तरुणाच्या वडीलांनी तो हरवल्याबाबतची दौलताबाद पोलीस स्टेशनला मिसींग दाखल करण्यात आली होती.