1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 30 डिसेंबर 2021 (18:47 IST)

नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला, अटकेची शक्यता

दिनेश केळुसकर
शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी कणकवलीचे आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे.
 
या प्रकरणातील पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे, अशी माहिती जिल्हा सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली आहे. पोलीस तपास करत आहेत.
 
आमदार नितेश राणे यांनी या प्रकरणात आपल्याला अटक होईल म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी मंगळवारी (28 डिसेंबर) अर्ज दाखल केला होता.
 
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मतदार आणि नितेश राणे यांचे कार्यकर्ते मनीष दळवी यांना न्यायालयाने मतदानाची परवानगी नाकारली होती.
 
संतोष परब हल्ला प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांना मनीष दळवी हवे आहेत. नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान बुधवारी (29 डिसेंबर) सरकारी वकिलांनी मनीष दळवी आणि नितेश राणे यांचे पीए राकेश परब यांचे कॉल डिटेल्स सादर केले. यात नितेश राणेंचा सहभाग असल्याचा दावा यावरून वकिलांनी केला.
 
आता या प्रकरणात अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ होत असल्याचं दिसून येतं.
 
नारायण राणेंना नोटीस
नितेश राणे अनरिचेबल असल्यामुळे त्यांना आणि त्यांचे वडील नारायण राणे यांना नोटीस पाठवली आहे.
 
पत्रकार परिषदेत माध्यमांच्या प्रतिनिधींनी नारायण राणेंना विचारले तेव्हा ते म्हणाले, 'नितेश राणे कुठे आहेत हे तुम्हाला का सांगू. नितेश राणे कुठे आहेत, ते तुम्हाला सांगायला मी मूर्ख आहे का?"
पण, हेच वक्तव्य आता त्यांना भोवण्याची चिन्हं दिसत असून यासंदर्भात पोलिसांनी नारायण राणे यांना चौकशीची नोटीस पाठवली आहे.
 
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कणकवली पोलिसांनी नोटीस बजावली आहे. संतोष परब हल्ला प्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी नारायण राणे यांना ही नोटीस देण्यात आलीये. पण सर्वात म्हत्त्वाची गोष्ट म्हणजे संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांचा पाहिजे आरोपी म्हणून पोलिसांनी नारायण राणे यांना दिलेल्या नोटीशीत उल्लेख केलाय.
 
या प्रकरणी आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवरच कारवाईची मागणी केली आहे. 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीला पोलीस स्टेशनमध्ये साक्षीसाठी बोलवता येत नाही हे पोलीस जाणीवपूर्वक विसरले असा आरोप फडणवीसांनी केला आहे.
 
ते म्हणाले, "सिंधुदुर्ग पोलिसांनी कायदा पाळायचा नाही असं ठरवलं आहे. CRPC 160 ची नोटीस देणारे पोलीस हे विसरले की 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीला पोलीस स्टेशनमध्ये साक्षीसाठी बोलवता येत नाही. त्यांची साक्ष घरी जाऊन घ्यावी लागते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीत बजावून साक्ष देण्यासाठी बोलवणं हा कायदेशीर अपराध आहे. संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर IPC 166A अंतर्गत एफआयआर नोंदवला जावा." अशी मागणी भाजपने केली आहे
नारायण राणे यांनी मंगळवारी या मुद्दयांवर काही विधान पत्रकार परिषदेत केली होती. हा विधान आक्षेपार्ह असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
 
नितेश राणेंचा ठावठिकाणा कुठे आहे हे तुम्हाला माहित आहे असं या नोटीशीत म्हटलं.
 
बुधवारी दुपारी जबाब नोंदवण्यासाठी उपस्थित रहावं असं या पोलिसांनी सांगितलं होतं. दरम्यान, आज आपण चौकशीला उपस्थित राहू शकत नसल्याचं पत्र नारायण राणे यांनी पोलिसांना पाठवल्याची माहिती समोर आली आहे.
 
काय आहे प्रकरण?
संतोष परब हे सिंधुदुर्गच्या कणकवली तालुक्यातले शिवसैनिक आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ते शिवसेनेच्या सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख आहेत. 18 डिसेंबरला दुचाकीवरून जात असताना आपल्यावर हल्ला झाल्याचा आरोप संतोष परब यांनी केला आहे.
 
एका गाडीनं आपल्याला आधी धडक मारली, त्यानंतर गाडीतून उतरलेल्या व्यक्तीनं चाकूनं हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोराने नीतेश राणेंना कळवायला पाहिजे असा उल्लेख केल्याचं संतोष परब यांनी एफआयआरमध्ये म्हटलं आहे.
 
याप्रकरणी पोलीसांनी मुख्य आरोपी सचिन सातपुतेसह चार जणांना अटक केली. त्यानंतर नितेश राणे यांचीही पोलीसांनी चौकशी केली. पण नितेश यांनी आपल्यावरचे आरोप साफ नाकारले तसंच अटकपूर्व जामिनासाठी सिंधुदुर्गातील जिल्हा न्यायालयात अर्जही दाखल केला.
 
याविषयी सिंधुदुर्गातले ज्येष्ठ पत्रकार सांगतात की "आदित्य ठाकरेंचं वाढतं महत्त्व हा मुद्दा आहेच, पण सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची ही निवडणूकही प्रतिष्ठेची बनली आहे. इथे राणेंच्या भाजपविरोधात महाविकास आघाडी एकत्रित उभी आहे. या निवडणुकीचे पडसाद सिंधुदुर्गातल्या आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतही उमटू शकतात याची सर्व पक्षांना कल्पना आहे. शिवसेना हा राणेंसाठी टीआरपी आहे आणि राणे हा शिवसेनेसाठी टीआरपी आहे. कोकणात वर्चस्व दाखवायचं असेल, तर एकमेकांविरोधात प्रखरपणे उभं राहणं दोघांसाठीही गरजेचं आहे."
 
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची आज (30 डिसेंबर) निवडणूक असून महाविकास आघाडी पॅनल विरुद्ध भाजपचं पॅनल असा सामना आहे.
 
19 जागांसाठी 39 उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीचा निकाल 31 डिसेंबरला जाहीर होणार आहे.
 
ही निवडणूक नारायण राणे यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. त्यासाठी राणे चार दिवसांपासून कणकवलीत तळ ठोकून बसले होते. तर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक सुद्धा कणकवलीत आहेत.
 
कोर्टात काय घडलं?
 
या अर्जावर 28 डिसेंबरला चार वाजता सुनावणी सुरू झाली. सुरुवातीला नितेश राणे यांच्यावतीने वकील संग्राम देसाई यांनी तब्बल दीड तास युक्तिवाद केला. हा युक्तिवाद करताना त्यांनी नितेश राणे यांचा या प्रकरणात कोणत्याच प्रकारचा सहभाग नाही असे म्हणणे मांडले.
 
नितेश राणे हे गुन्हा घडला त्या ठिकाणी ना हजर होते, ना त्या भागाच्या दृष्टीक्षेपात होते. शिवाय ज्या दिवशी हल्ला झाला त्या 18 डिसेंबर पासून 26 डिसेंबर पर्यंत नितेश राणे यांनी कणकवली पोलीस स्टेशनला जाऊन पोलीसांच्या चौकशीला उत्तरेही दिली आहेत, असं देसाई यांनी कोर्टापुढे मांडलं.
 
शिवाय पोलिसांनी या प्रकरणातील सहावा आरोपी सचिन सातपुते याच्या रिमांड रिपोर्ट मध्ये नमूद केलेल्या वर्णनाचा मुद्दा वकील देसाई यानी उचलला.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार आरोपी सचिन सातपुते याने नितेश राणे यांच्या संगनमताने या गुन्ह्याचा कट रचला आणि नितेश राणे यांनी फिर्यादीचा फोटो सातपुते यांना दिला. ती जागा सातपुते याने दाखवली आहे आणि आणि त्या जागेचा पंचनामा पोलिसांनी केलेला आहे.
 
शिवाय नितेश राणे आणि आरोपी सचिन सातपुते यांचा एकत्र फोटोही पोलिसांनी रिमांड रिपोर्टच्या कागदपत्रात जोडलेला आहे .
 
अशा वेळी आता नितेश राणे यांच्याकडून हस्तगत करण्यासारखे काहीही उरत नाही. तसेच जे काही कॉल डिटेल्स आवश्यक आहेत ते डिटेल्स मोबाईल कंपन्यांच्या सर्व्हिस प्रोवायडर कडून पोलीस घेऊ शकतात त्यामुळे नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन मंजूर व्हावा अशी विनंती कोर्टाला देसाई यांनी केली.
 
हे सांगताना वकील देसाई यांनी तक्रारदार संतोष परब यांच्या जबाबावर आधारीत मूळ FIR हाच कसा राजकीयदृष्ट्या प्रभावित आहे हे अनेक उदाहरणे देऊन न्यायालयाला पटवून द्यायचा प्रयत्न केला. हा युक्तिवाद तब्बल दीड तास चालला.
त्यानंतर सरकारी पक्षाच्या वतीने वकील प्रदीप घरत यांनी युक्तिवाद सुरू केला. वकील घरत यांनी ॲड देसाई यांच्या युक्तिवादातल्या एकेका वाक्याला घेऊन ते खोडून काढण्यास सुरुवात केली.
 
मुळात संतोष परब यांच्यावरील हल्ला हा एका सुनियोजित कटाचा भाग का आहे आणि त्या कटाचा तपास करण्यात पोलीस नितेश राणेंपर्यंत का पोहोचले आहेत हे घरत यानी मांडण्यास सुरुवात केली.
 
संतोष परब यांच्यावर हल्ला करण्यासाठी आलेले आरोपी हेच जर अनोळखी असतील तर असे अनोळखी आरोपी कुणाच्या तरी सांगण्यावरूनच हल्ला करण्यास आले असा दावा वकील घरत यांनी केला. आणि असा हल्ला करण्यास सांगण्याऱ्यापर्यंत पोहोचणं हे पोलिसांचं कर्तव्य कसं आहे हे घरत यांनी न्यायालयासमोर मांडलं.
 
मात्र सरकारी वकिलांना मध्येच कोर्टाने थांबवून अजून तुम्हाला किती वेळ लागेल असा प्रश्न विचारला.
 
सरकार पक्षाने अजून किमान दोन तास लागतील असे सांगितले. त्यावर कोर्टाने आता उशीर झालाय उद्या दुपारी ही सुनावणी कोर्ट घेईल असे म्हटले. त्यावेळी संध्याकाळचे साडेसहा वाजले होते.
 
दरम्यान फिर्यादी संतोष परब यांच्यावतीने आलेले वकील विकास पाटिल यांनी कोर्टाला कमीत कमी माझे म्हणणे तरी आज न्यायालयाने ऐकून मग उरलेलं कामकाज उद्या ठेवावं अशी विनंती केली.
 
पाटील यांची विनंती मान्य करीत पावणे सात पर्यंत न्यायालयाचे कामकाज चालवले. वकील पाटील यांनी अपल्या म्हणण्यात संतोष परब यांच्यावरील हल्ला हा सुनियोजित कटाचा भाग कसा आहे हे न्यायालयासमोर मांडले आहे.
 
उद्या या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होण्यास किमान तीन तास तरी लागणार आहेत . त्यानंतर मग न्यायालय आपला निर्णय देणार आहे. त्यामुळे नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन मंजूर होणार की फेटाळला जाणार याची चर्चा आता सिंधुदुर्गात सुरू झाली आहे. पोलिसांनी जिल्ह्यात सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला आहे