बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021 (08:40 IST)

मुख्यमंत्र्यांचा मुलगा त्यात सहभागी असल्याने अटकेची कारवाई झाली नाही : नारायण राणे

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग आणि दिशा सॅलियन हत्या प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. सुशांत सिंगच्या हत्येचे तसंच सहभागी होते त्यांच्यासंबंधी आपण पुरावे दिले होते, मात्र मुख्यमंत्र्यांचा मुलगा त्यात सहभागी असल्याने अटकेची कारवाई झाली नाही असा गंभीर आरोप नारायण राणे यांनी केला आहे.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या नारायण राणे यांनी दिशा सॅलियनला इमारतीतून खाली फेकून देण्यात आल्याचा दावा केला. “सुशांत सिंगची त्याच्याच बाथरुममध्ये हत्या झाल्याचे पुरावे मी दिले. या हत्येत सहभागी असणाऱ्यांची नावंही मी दिली. पण मुख्यमंत्र्यांचा मुलगाच सहभागी असल्याने कोणतीही अटकेची कारवाई झाली नाही. दिशा सॅलियन प्रकरणातही कोणती अटक झाली नाही,” असं सांगत नारायण राणे यांनी अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.
नारायण राणे यांनी यावेळी राज्यातील कायदा-सुव्यस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत दिशा सॅलियन आणि पूजा चव्हाण प्रकरणाचा उल्लेख केला. पुण्यातील विद्यार्थिनी पूजा चव्हाणने आत्महत्या करुन जीवन संपवलं होतं. याप्रकरणी राज्याचे माजी मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाले होते.
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “दिशा सॅलियनची हत्या करण्यात आली. सुशांत तिचा मित्र होता. त्याने तिच्या हत्येची माहिती लपवण्यास नकार दिला म्हणूनच त्याचीही हत्या करण्यात आली. संजय राठोड यांनाही सरकारकडून संरक्षण देण्यात आलं. अजून किती हत्या ते लपवणार आहेत? यामुळे महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत १० वर्ष मागे गेला आहे”.