शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 22 नोव्हेंबर 2023 (21:55 IST)

तंबाखू मागण्याच्या बहाण्याने गिरणारेत लाखाची रोकड लांबविली

crime news
नाशिक : गिरणारे येथील जे.पी.फार्मस्‌‍ जवळ लघुशंकेसाठी थांबलेल्या ग्रामीण व्यक्तीस तंबाखू मागण्याच्या बहाण्याने मारहाण करून त्याच्याकडील एक लाख रुपयांची रोकड तीन तरूणांनी लंपास केल्याची घटना गेल्या दहा नोव्हेंबर रोजी घडली. या प्रकाराने भांबावलेले  खुशाल नामदेव बेंडकोळी (वय 48, रा. वेळे, शिवाजीनगर, ता. त्र्यंबकेश्वर) यांना नातेवाईकांनी सावरून धीर दिल्यानंतर त्यांनी याबाबत दि.21 रोजी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे.
 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी खुशाल बेंडकोळी हे दि.10 रोजी गिरणारे येथील एचडीएफसी बँकेत भरणा करण्यासाठी एक लाख रुपये घेऊन जात होते.
 
दरम्यान, त्यांना लघुशंका लागल्याने ते या रोडवरील जे.पी. फार्म जवळील पेट्रोल पंपाच्या अलिकडे थांबले होते. यावेळी गिरणारेहून हरसूलकडे जाणारी एक
मोटारसायकल आली. त्यावर 30 ते 35 वर्ष वयोगटातील तीन तरूण बसले होते. त्यांनी गाडी थांबवून खुशाल बेंडकोळी यांच्याकडे तंबाखू मागितली. तंबाखू काढतच असतानाच तिघा संशयितांपैकी अंगाने मजबूत, रंगाने गोरा आणि बुटका असलेला तरूणाने पाठीमागून येऊन खुशाल बेंडकोळी यांचे हात पकडले. तर दुसऱ्या तरूणाने बेंडकोळी यांचे तोंड दाबून धरले आणि तिसऱ्या मुलाने बेंडकोळी यांचे खिसे तपासून खिशात असलेले एक लाख रुपये बळजबरीने काढून घेतले.
 
त्यानंतर बेंडकोळी यांची मोटारसायकल रस्त्यावर आडवी पाडून त्यांना जवळच असलेल्या रस्त्याच्या कडेच्या मातीवर ढकलून दिले आणि चोरटे स्वत:च्या मोटारसायकलवर बसून फरार झाले.
 
या घटनेने खुशाल बेंडकोळी हे घाबरून, भांबावून गेले होते. मात्र परिचित व्यक्तींनी धीर दिल्यामुळे तब्बल दहा दिवसांनी त्यांनी या घटनेबाबत तालुका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. पोलिसांनी भादंवि 392 अन्वये गुन्हा नोंदविला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही.एस. माळी हे करीत आहेत.