आबांची कन्या होणार थोरात यांची सून
राज्याचे दिवंगत गृहमंत्री आर. आर. (आबा) पाटील यांच्या कन्येचे शुभमंगल येत्या महाराष्ट्रदिनी होणार आहे. पुण्यातील मगरपट्टा सिटी येथे हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. या विवाह सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी जातीने लक्ष घातले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती अध्यक्ष असणार्या आर. आर. आबांच्या कन्या स्मिता पाटील या दौंडच्या सुनबाई होणार आहेत. पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांचे पुतणे आनंद थोरात यांच्याशी त्या विवाहबद्ध होणार आहेत. या नव्या नात्यामुळे राज्यातील पाटील व थोरात ही दोन राजकीय घराणी एकत्र येणार आहेत.
आर. आर. आबांच्या निधनानंतर पाटील कुटुंबीयांवर राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांचे जबाबदारीच्या दृष्टीने विशेष लक्ष असते. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच या विवाहासाठी पुढाकार घेतला आहे. आर. आर. पाटील व रमेश थोरात हे शरद पवार यांचे खंदे समर्थक आहेत.
माजी गृहमंत्री आर. आर. आबांच्या निधनानंतर त्यांच्या तासगाव मतदार संघाचे नेतृत्व पत्नी सुमनताई पाटील यांच्याकडे आहे. निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत स्मिता यांनीच प्रचाराची धुरा सांभाळली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांच्याकडे युवती अध्यक्षपदाची जबाबदारीही सोपवली आहे.