शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 12 मे 2022 (21:40 IST)

चक्क पोलिसांनीच लुटले 6 कोटी रुपये; 3 पोलीस अधिकाऱ्यांसह 10 जण निलंबित

crime
जिल्ह्यातील मुंब्रा येथील एका खेळणी व्यापाऱ्याकडील सहा कोटी रुपये पोलिसांनीच लुटल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका पत्राद्वारे ही माहिती उघड झाल्यानंतर पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तीन पोलीस अधिकाऱ्यांसह सात कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. एसीपी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची खात्यांतर्गत चौकशी केली जाणार आहे. पोलिस कर्मचारी बॉक्स घेऊन जातानाचे सीसीटीव्ही फुटेज उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
 
मुंब्रा येथील बॉम्बे कॉलनीत राहणारे फैजल मेमन हे खेळण्याचे व्यापारी आहे. मेमन यांच्या घरात तीस वेगवेगळ्या बॉक्समध्ये प्रत्येकी एक कोटी रुपये या हिशेबानुसार 30 कोटी रुपये लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना 12 एप्रिल रोजी रात्री साडेबाराला मिळाली होती. माहिती मिळताच मुंब्रा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे यांच्या नेतृत्वाखालील उपनिरीक्षक हर्षद काळे, मदने यांच्यासह तीन कर्माचऱ्यांच्या पथकाने मेमन यांच्या घरावर धाड टाकली.
 
त्यादरम्यान मेमन यांच्या घरात पोलिसांना तीस खेळण्याच्या बॉक्समध्ये प्रत्येकी एक कोटी रुपयांप्रमाणे तीस कोटी रुपये आढळले. पोलिसांच्या पथकाने मेमन यांच्यासह तीस बॉक्स मुंब्रा पोलीस ठाण्यात आणले. हा काळा पैसा असून, यातील निम्मी रक्कम आम्हाला दे, अशी मागणी करत पोलिसांनी दमदाटी केल्याचा आरोप इब्राहिम शेख यांनी पोलीस आयुक्त जयजित सिंह यांना दिलेल्या तक्रार अर्जात केला आहे.
 
मेमन यांनी पोलिसांना दोन कोटी रुपये देण्यास मान्य केले. परंतु पोलिसांनी सहा बॉक्स ठेवून घेतले आणि 24 बॉक्स मेमन यांना परत केले. सहा बॉक्समध्ये प्रत्येकी एक कोटी रुपये होते. मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक कडलग यांच्या कॅबिनमध्ये सहा कोटी रुपये ठेवले. पोली ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये सर्व घटना उघडकीस येईल, असे इब्राहिम यांनी पत्रात म्हटले आहे.
 
या पत्राच्या प्रती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह पोलीस महासंचालक, ठाणे सह पोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त, कळवा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्तांना या पत्राच्या प्रती तक्रारदार इब्राहिम यांनी पाठवल्या आहेत. मुंब्रा पोलीस ठाण्यातील तीन अधिकारी आणि सात कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या सर्वांची चौकशी परिमंडळ एकच्या पोलीस आयुक्तांमार्फत करण्यात येणार आहे.