साताऱ्यात विहीरी पेट्रोलने भरल्या
सध्या पेट्रोलचे दर गगनाला भिडले असताना सामान्य माणूस त्रस्त आहेत. दरम्यान साताऱ्यातील सासवड येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे चोरांनी पेट्रोल चोरीसाठी चक्क पेट्रोल वाहून नेणारी पाईपलाईन फोडली दोन हजार लिटर पेट्रोल लंपास करण्यात आलं. नंतर पेट्रोल पाईपलाईन तशीच सोडून दिल्यामुळे परिसरातील विहिरीत पेट्रोल भरले आहे.
हिंदुस्थान पेट्रोलियमच्या मुंबई-पुणे-सोलापूर या 223 किलोमीटर पाईपलाईनला साताऱ्यातील सासवड गावाजवळ चोरट्यांनी भगदाड पाडले. लाखो रुपयांचे पेट्रोल चोरट्यांनी चोरून नेले. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा घटनास्थळी धाव घेत भगदाड बंद करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना झाली नाही. मात्र पाइपलाइन फोडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पेट्रोल वाहून गेलं.
हजारो लिटर पेट्रोल जमिनीत मुरल्यामुळे या भागातील विहिरी पेट्रोलनी भरल्या आहेत. तसंच जमिनीत मुरलेल्या प्रेट्रोलमुळे अनेक एकर शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झालं आहे. विहिरीतील मासे आणि बेडूक, तसंच परिसरातील साप मृत झाल्याचं दिसून आल्यानंतर हा प्रकार समोर आला.
या भागातील लोकांनी शेतीचं मोठं नुकसान झाल्याचं सांगितलं आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विहिरीच्या परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला असून खबरदारी म्हणून अग्निविरोधक यंत्र विहिरीजवळ ठेवण्यात आले आहे.