सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 19 मार्च 2022 (08:40 IST)

सासू-सासऱ्याला विष देऊन मारण्याचा सुनेचा प्रयत्न; तिघांविरुध्द गुन्हा दाखल

सासू-सासऱ्याला विष देऊन मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुनेसह तिघांविरुध्द खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गंगापूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुनील भिमराव भिसे (वय ४४, रा. सुनील फोटो स्टुडिओ, शिवाजीनगर) यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीवरुन लता सुनील भिसे (शिवाजीनगर, सातपूर), जिजाबाई गुंजाळ (नवले कॉलनी, नाशिकरोड), संजयकुमार पंढरीनाथ पाटील (रुम क्रमांक ३, विश्वासनगर, अशोकनगर, सातपूर) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूनेने सुसाईड नोट लिहून आत्महत्येचा प्रयत्न केला तसेच नवऱ्यालाही विष देवून ठार मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
 
सुनील भिसे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माझी पत्नी लता हिने वेगळे रहाण्यासाठी वारंवार भांडणे करून शिवीगाळ, दमदाटी तसेच मारहाण केली. आई-वडिलांना विष देवून मारण्याचा प्रयत्न केला. तसेच लता हिने सुसाईड नोट लिहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. लता हिने जिजाबाई गुंजाळ यांना फोन करून विष मागवून घेतले व मला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या सर्व प्रकरणात जिजाबाई गुंजाळ व संजयकुमार पाटील यांनी फूस लावली. या तक्रारीत पत्नीचे अनैतिक संबध संजयकुमार पाटील यांच्यात असल्याचेही म्हटले आहे. हे अनैतिक संबंध समजल्यावर मी पत्नीला समजावून सांगितले. तरीही संबंध कायम ठेवून फसवणूक केली. या तिघांचा संपत्तीवर डोळा असल्याचेही भिसे यांनी म्हटले आहे. या तक्रारीवरुन भादंवि ३०७, ३२३, ५०४, ५०६, ४९७, १०९, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात उपनिरीक्षक शेंडकर हे तपास करत आहेत.