मंगळवार, 17 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 4 मार्च 2023 (21:11 IST)

सप्तशृंगी मंदिरातील “ती” चोरी सुरक्षा रक्षकाकडूनच

Saptashrungi
उत्तर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या सप्‍तशृंगी मंदिराच्या रोपवेच्या परतीच्या मार्गावर असलेल्या दानपेटीतून सुरक्षारक्षकाने रक्‍कम काढण्याचा प्रयत्न केला. याबाबत मंदिराचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी कळवण पोलिसांकडे फिर्याद नोंदविली असून, भा. दं. वि. कलम 379, 427 अन्वये सुरक्षारक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
 
दरम्यान, दानपेटीतून किती रक्‍कम चोरीस गेली, याचा अंदाज नसला, तरी मोठी रक्‍कम काढली गेली असल्याची शक्यता आहे. पोलीस तपासानंतरच रकमेचा अंदाज लागणार आहे.
 
याबाबत व्यवस्थापक दहातोंडे यांनी नोंदविलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की मंदिर परिसरात एकूण लहान-मोठ्या 41 दानपेट्या आहेत. त्यापैकी रोपवेच्या बाहेर पडण्याच्या मार्गावर असलेल्या दानपेटी क्रमांक 40 व 41 दरम्यान दि. 13 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी काही नोटा जळालेल्या अवस्थेत दानपेटीजवळ जळालेल्या अवस्थेत पडलेल्या आढळल्या. त्यामुळे मंदिर परिसरातील सीसीटीव्हीचे कॅमेरे तपासले असता, सर्व कॅमेर्‍यांना चुना लावण्यात आला होता.
 
तसेच कॅमेर्‍यांची दिशा बदलण्यात आली होती. या घटनेची माहिती सुरक्षा विभागप्रमुख यशवंत गुलाबराव देशमुख यांना दिली असता. त्यांनी अधिक पाहणी केली.
 
यावेळी दानपेट्या उचकावण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून आले. या घटनेच्या दिवशी रात्री 9 ते पहाटे 5 दरम्यान कर्तव्यावर असलेला सुरक्षारक्षक सोमनाथ हिरामण रावते याने कॅमेर्‍याची दिशा बदलून व कॅमेर्‍यांना चुना लावून काठीला चिकट पदार्थ लावून दानपेटीतील रक्‍कम काठीच्या सहाय्याने काढण्याचा प्रयत्न केला,
 
असे प्रथमदर्शन दिसून आले. दि. 12 फेब्रुवारी 2023 च्या रात्री झालेल्या या घटनेची 13 फेब्रुवारी ते 2 मार्च 2023 दरम्यान विश्‍वस्त संस्थेमार्फत संपूर्ण चौकशी करुन चौकशीचे सर्व दस्तऐवज आणि उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज घेऊन मंदिराचे व्यवस्थापक दहातोंडे यांनी शनिवारी कळवण पोलीस ठाण्यात येऊन चोरीचा प्रयत्न झाल्याची तक्रार नोंदविली आहे.
 
रोपवेच्या परतीच्या मार्गावर दानपेटी क्रमांक 40 व 41 मध्येच हा प्रकार घडला असून, इतर सर्व दानपेट्या सुरक्षित आहेत. असे असले तरी किती रक्‍कम चोरीला गेली किंवा जाळण्यात आली, याचा तपशील पोलीस तपासातच स्पष्ट होणार आहे.
 
Edited By-Ratnadeep Ranshoor