सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 2 मार्च 2023 (13:56 IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेळगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहर सज्ज

narendra modi
बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेळगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहर सज्ज झाले आहे. रोड शो व जाहीर सभेसाठी तयारी पूर्ण झाली असून रोड शोच्या मार्गावर बॅरिकेड्स उभे करण्यात आले आहेत. संपूर्ण शहरात व्यापक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रविवारी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी तयारीचा आढावा घेतला. सोमवार दि. 27 फेब्रुवारी रोजी दुपारी शिमोग्याहून पंतप्रधान विशेष विमानाने सांबरा विमानतळावर दाखल झाले आहेत. तेथून हेलिकॉप्टरने 2.15 वाजण्याच्या सुमारास एपीएमसीजवळील राज्य राखीव पोलीस दलाच्या परेड मैदानावरील हेलिपॅडवर पंतप्रधानांचे आगमन होणार आहे. त्यानंतर राणी कित्तूर चन्नम्मा चौक परिसरातून रोड शोला प्रारंभ होणार आहे. पंतप्रधानांच्या ताफ्यातील वाहने बेळगावात दाखल झाली आहेत. चन्नम्मा सर्कलपासून जाहीर सभेच्या ठिकाणापर्यंत तब्बल 8 ते 10 किलोमीटर हा रोड शो होणार आहे. दुपारी 3.15 वाजता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार असून सायंकाळी 4.30 पर्यंत जाहीर सभा होणार आहे. जाहीर सभेसाठी एक लाखाहून अधिक नागरिकांची उपस्थिती अपेक्षित असून पोलीस दलाने पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर व्यापक तयारी केली आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी रविवारी दुपारी बेळगावला भेट देऊन तयारीची पाहणी केली. शिमोगा येथील विमानतळाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान बेळगावला येणार आहेत.
 
विविध विकासकामांचा शुभारंभ
आपल्या बेळगाव दौऱ्यात पंतप्रधान विविध विकासकामांना चालना देणार आहेत. बेळगाव रेल्वेस्थानकाचे उद्घाटन, लोंढा-बेळगाव-घटप्रभा दुपदरी रेल्वेमार्गाचे उद्घाटन, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 13 व्या टप्प्याचे अनुदान वितरण, महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेला चालना आदी विविध विकासकामांचा शुभारंभ केला जाणार आहे.
 
किसान सन्मान निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
 
यावेळी पत्रकारांशी बोलताना केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, देशातील 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 2 हजार रुपयेप्रमाणे 16 हजार कोटी रुपये साहाय्यधन थेट जमा होणार आहे. यामध्ये कर्नाटकातील 49 लाख 55 हजार शेतकऱ्यांचा समावेश असून त्यांच्या खात्यावर 991 कोटी रुपये जमा होणार आहेत. बेळगाव जिल्ह्यातील 5 लाख 10 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 102 कोटी रुपये जमा होणार आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor