बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 19 सप्टेंबर 2022 (08:41 IST)

मराठवाड्यातील रोजगार उपलब्धतेच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गती मिळेल

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येत्या १७ व १८ सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे पंतप्रधान उद्योजकता महारोजगार मेळाव्याचे त्याचबरोबर नवउद्योजकांना चालना देण्यासाठी स्टार्टअप प्रदर्शन, युवकांसाठी करिअर कौन्सिलिंग, स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्धतेबाबत माहिती, आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी ऑन जॉब ट्रेनिंग,अप्रेंटीशीपच्या संधी यांविषयी माहिती, फोटो गॅलरी अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नोकरी इच्छुक उमेदवार आणि उद्योजक यांना या मेळाव्यात एकाच व्यासपीठावर आणण्यात येणार असून पात्र उमेदवारांना तिथेच नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
 
मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, महाराष्ट्राच्या विकासात मराठवाड्याचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामात योगदान देणाऱ्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन देण्यासाठी महारोजगार मेळाव्यासह इतर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असून प्रधानमंत्री यांनी स्किल इंडिया मोहिमेद्वारे देशातील प्रत्येक युवकाला कौशल्य प्रशिक्षण आणि त्याद्वारे रोजगार, स्वयंरोजगार मिळवून देण्याचे सुनिश्चित केले आहे. महारोजगार मेळावा आणि त्याबरोबर आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांमधून मराठवाड्यातील रोजगार उपलब्धतेच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.