गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 डिसेंबर 2021 (08:07 IST)

मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करीत तरुणाने घेतला गळफास

जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील १७ वर्षीय तरुणाने  रात्री राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे तरुणाने मोबाईल स्टँडला लावत त्याचा कॅमेरा सुरू करून त्याने आपल्या आत्महत्येचे चित्रीकरण करून ठेवल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. घनश्याम संजय भोई असे या तरुणाचे नाव आहे.
 
पिंप्राळा परिसरातील सेंट्रल बँक कॉलनीत घनश्याम भोई हा तरुण आई मंदाबाई, वडील, मोठी बहिण गीता यांच्यासह वास्तव्याला आहे. आईवडील आणि मोठी बहिण हे देवाचा कार्यक्रम असल्यामुळे मुळगावी नेरी पिंप्री ता.जामनेर येथे गेल्याने तो घरात एकटाच होता.
 
घरी कुणीही नसल्याने त्याने राहत्या घरात मोठ्या आवाजात गाणे लावून गळफास घेवून आत्महत्या केली. शेजारी राहणाऱ्या महिलेला हा प्रकार लक्षात आल्याने घटना उघडकीला आली आहे. दरम्यान, शेजारच्यांनी रामानंद नगर पोलीसांना घटनेची माहिती दिली असून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आला रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
 
दरम्यान, गळफास घेण्याआधी घनश्याम याने समोर स्टँडला मोबाईल लाऊन त्यातील कॅमेरा सुरू केला होता. यामुळे यात त्याच्या आत्महत्येची घटना मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाल्याचे पोलिसांना तपासणीत आढळून आले आहे. त्याने हे पाऊल नेमके कशासाठी उचलले? आत्मघात करत असतांना त्याने याचे रेकॉर्डींग का केले? याची माहिती मात्र पोलिसांना मिळालेली नाही. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.