या आरोप करणाऱ्यांना किंमत देण्याची गरज नसून ही त्यांची पोटदुखी आणि मळमळ : मुख्यमंत्री
पुण्यातील कोविड सेंटरमधील भ्रष्टाचार आणि १०० कोटींचं कंत्राट चहावाल्याला दिल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.जालना येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या नूतन वास्तुचा लोकार्पण सोहळ्यात व्हिसीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी झाले होते. या सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या आरोप करणाऱ्यांना किंमत देण्याची गरज नसून ही त्यांची पोटदुखी आणि मळमळ असल्याचा टोला किरीट सोमय्यांना लगावला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोना महामारीच्या काळात देशात इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील कामं जास्त उजवं ठरलं आणि चांगल्या परिस्थितीने ती परिस्थिती हाताळू शकलो. अनेक ठिकाणी कोविड सेंटर उभारली गेली, चाचणी केंद्र उभारली गेली. त्याच्यामध्ये फक्त सरकारचा भाग नाही. धर्मादायी संस्थांचा देखील सहभाग आहे. काही जणांना हे आपलं कौतुक परवडत नाही, त्यामुळे पोटात मळमळ होतेय. त्याच्यामुळे कुठेतरी खणून काढायचं सुरू आहे. भ्रष्टाचार काढणार, हे काढणार. काढा. काय काढायचं ते काढा. पण मी माझं एक नक्की समाधान सांगेन की, त्यावेळी जास्तीत जास्त सेवा जनतेला देऊ शकलो, त्यामुळे अनेकांचे प्राण आपण वाचवू शकलो. आणि ते प्राण, ती जनता आरोप करणाऱ्यांच्यापेक्षा टक्केवारीत खूप पटीने जास्त आहे.
कोरोना काळात राजेश टोपे तुम्ही जे काही पाय रोवून उभे राहिलात. कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन आलात, हॉस्पिटलमध्ये जाऊन आलात, काय हवं नको ते पाहिलं. औषधांची सोयी, सुविधा, जोपर्यंत आपल्याकडून होत नाही तोपर्यंत संस्थांकडून कुठली होऊ शकते हे तुम्ही पाहिलं. म्हणूनच मला असं वाटत, या आरोप करणाऱ्यांना किंमत देण्याची गरज नाही, ही त्यांची पोटदुखी, मळमळ आहे. त्यांना सुद्धा आपल्या आरोग्य केंद्रात तपासणी करू घ्यायची असेल तर जरूर करून घेऊ शकतात. सरकार दराने, किंवा फुकट करून देऊ. इलाज करणे हे आपलं कर्तव्य आहे. केवळ विरोधक आहेत, म्हणून त्यांचा इलाज करायचा नाही अशातला भाग नाही. आपण इलाज करू शकतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.