शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 19 ऑक्टोबर 2020 (07:48 IST)

यंदाच्या नवरात्रोत्सवाला साधेपणाने सुरुवात, भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची सोय

राज्यात सर्वत्र साधेपणा आणि भाविकांच्या अनुपस्थितीत नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. नागरिकांना घरोघरी देवीची पूजा करत घटस्थापना केली. तर मंदिरांमध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सर्व नियमांचे पालन करत उत्सवाला सुरुवात झाली. दुसरीकडे सर्वच मंदिरामध्ये भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची सोय करून देण्यात आली आहे. 
 
कोल्हापूर – 
कोरोनामुळे करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे मंदिर भाविकांसाठी बंद असले तरी देवीलाच घराघरांतील मोबाईलपर्यंत पोहोचविण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने मंदिरच डिजिटल विश्वावर आणले आहे. नवरात्रौत्सवाचे मुहूर्त साधूनऑनलाईन लाईव्ह दर्शन, फेसबुक पेज, यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवरील पेजचे उद‌्घाटन अध्यक्ष महेश जाधव व खजिनदार वैशाली क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. यामुळे पहाटेच्या काकडआरतीपासून रोजची सालंकृत पूजा, पालखी हा सगळा सोहळा भाविकांना ऑनलाईन पाहता येणार आहे.
 
या पेजवर अंबाबाईचे दर्शन घेऊ शकता.
 
https://play.google.com/store/apps/detailsid=com.smac.ambabailive
 
https://www.mahalaxmikolhapur.com/gallery/shri-mahalaxmi-live-darshan.html
 
तुळजापूर -
‘आई राजा उदो उदो, सदानंदीचा उदो उदो’च्या गजरात व संबळाच्या वाद्यात तुळजाभवानी मंदिरात  संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते पारंपारिक पद्धतीने घटस्थापना झाली. या घटस्थापनानंतर दिवेगावकर दांपत्याच्या हस्ते पुढील नऊ दिवसाच्या विविध धार्मिक पूजा विधीसाठी ब्रह्मवृंदास वर्णी देण्यात आली.
 
सकाळी नित्योपचार पंचामृत अभिषेक झाल्यानंतर अलंकार पूजा मांडण्यात आली. नैवेद्य, धुपारती, अंगारा हे विधी संपन्न झाल्यावर मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर व त्यांच्या पत्नी यांनी तुळजाभवानीचे दर्शन घेऊन मनाची आरती केली. श्री गोमुख तीर्थावरील घट-कलशाची विधीवत पूजा करून घट, कलश संबळाच्या वाद्यात तुळजाभवानी मंदिरात आणण्यात आले. या ठिकाणी दिवेगावकर दांपत्याच्या हस्ते देवी समोरील सिंह गाभाऱ्या पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. यानंतर मंदिर परिसरातील उप देवतांच्या ठिकाणी घटस्थापना करण्यात आली.
 
वणी 
महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश व अन्य राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि राज्यातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीचा नवरात्रौत्सव कोरोना प्रादुर्भावामुळे इतिहासात पहिल्यांदाच भविकांविना पार पडत आहे. 
 
घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी सकाळी सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट कार्यालयातून देवीच्या दागिन्यांची विधीवत पूजा करण्यात आली. यानंतर दागिने व आभूषणे मंदिरात नेण्यात आली. देवीची विधीवत पूजा करण्यात येऊन नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली. भाविकांना गडावर येण्यास बंदी असल्याने ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान, गडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदुरी येथेच पोलिसांकडून बॅरिकेडींग करण्यात आलेली असून उत्सव काळात गडावर प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे.
 
देवीचे ऑनलाईन दर्शनासाठी 
https://youtu.be/hEdDEi_izEA या संकेतस्थळावर जाऊन भाविकांना घरबसल्या देवीचे ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे तसेच http://www.saptashrungi.net/donation.php भाविकांना ऑनलाईन देणगी ट्रस्ट या संकेतस्थळावर जाऊन देणगी देता येणार आहे.