शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 5 डिसेंबर 2021 (15:45 IST)

गिरीश कुबेरांवर शाई फेकली; त्या पुस्तकातला वादग्रस्त मजकूर काय?

अनघा पाठक
नाशिक इथे सुरू असलेल्या साहित्य संमेलनात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली.
संमेलनाच्या मुख्य स्थळी बॅटरी गाडीतून येत असताना हे घडलं. संभाजी ब्रिगेडच्या दोन व्यक्तींनी कुबेरांवर शाईफेक केली. वृत्तमाध्यमांचे मनोरंजनीकरण या परिसंवादाचे कुबेर अध्यक्ष आहेत.
गिरीश कुबेर यांनी त्यांच्या पुस्तकात छत्रपती संभाजीराजेंचा अपमान केला आहे असं शाईफेक करणाऱ्यांचं म्हणणं होतं. संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी नितीन रोटे पाटील यांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गिरीश कुबेरांवर शाईफेक केल्याला दुजोरा दिला.
 
'लोकसत्ता'चे संपादक आणि लेखक गिरीश कुबेर यांचं 'रेनेसाँ स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ मेकिंग ऑफ महाराष्ट्र' हे इंग्रजी भाषेतील पुस्तक अलीकडेच प्रकाशित झालं. महाराष्ट्राची जडण-घडण उलगडून दाखवताना त्यांनी 'डेक्कन आफ्टर शिवाजी' या प्रकरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काय झालं, याची मांडणी केली होती.
 
शिवाजी महाराजांच्या पत्नी सोयराबाई यांची हत्या शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांनीच केल्याचा उल्लेख या पुस्तकात होता.
कुबेर लिहितात: 'अखेर वारशाचा वाद संपुष्टात आणण्यासाठी संभाजींनी सोयराबाई आणि त्यांच्याशी निष्ठा असणाऱ्यांना ठार केलं. त्यांपैकी काही जण शिवाजींच्या अष्टप्रधान मंडळातील होते. या रक्तपातामुळे शिवाजींनी तयार केलेल्या मौल्यवान अशा कतृत्ववान मंडळीच्या फळीचा अंत झाला. नंतर संभाजींना याची मोठी किंमत चुकवावी लागली.'
 
पुस्तकात छत्रपती संभाजी यांच्याविषयीचं लिखाण "खोडसाळपणाचं" असल्याचा आरोप करत भाजपने पुस्तकावर बंदीची मागणी केली होती.
 
राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हेंनी पुस्तकातून हा भाग वगळण्याची मागणी केली आहे. तर गिरीश कुबेरांनी माफी मागावी, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी म्हटलं आहे. संभाजी ब्रिगेड आणि इतर मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्या होत्या.
 
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर असं कृत्य अयोग्य-संजय राऊत
"या घटनेचा मी निषेध करतो. त्यांनी केलेल्या लिखाणासंदर्भात मतभेद असू शकतात. त्यांनी काय लिहिलंय हे किती लोकांनी वाचलंय. साहित्य संमेलन सुरू असताना असं कृत्य करणं कोणालाही मान्य ठरणार नाही", असं सामनाचे संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
 
ते पुढे म्हणाले, "त्यांनी जे लिहिलं त्यासंदर्भात तक्रारी दाखल करण्यात आल्या. साहित्य संमेलन अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं व्यासपीठ. कुबेरांना धक्काबुक्की, त्यांच्यावर शाईफेक हे संभाजीराजे यांच्या प्रतिमेला डागाळण्यासारखं आहे. ज्यांना त्यांचं पटत नाही त्यांच्याशी वाद घालावा. तुमच्या लिखाणाला आधार नाही हे सप्रमाण दाखवून द्यावं. वाद-चर्चा होऊ शकतो. धिक्कार होऊ शकतो. पण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर असं कृत्य होणं योग्य नाही".
 
संभाजी ब्रिगेडच्या हल्ल्याची कुणकुण-भुजबळ
संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते निषेध व्यक्त करणार याची कुणकुण लागली होती. ते येऊन लेखी निवेदन देतील, निषेध करतील असं वाटलं होतं. परंतु शाईफेकीचा प्रकार घडल्याने मी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असं अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
 
सोयराबाई कोण आहेत?
शिवाजी महाराजांची पट्टराणी म्हणून मान मिळालेल्या सोयराबाई या मोहिते घराण्यातल्या. धाराजी मोहिते आणि संभाजी मोहिते या मातब्बर लढवय्यांनी शहाजी राजेंच्या सैन्यात पराक्रम गाजवला. त्यातील संभाजी मोहिते यांची मुलगी सोयराबाई. शिवाजी महाराजांसोबत त्यांचा विवाह झाल्याची निश्चित तारीख सापडत नाही. त्यांना पुढे बाळीबाई उर्फ दीपाबाई आणि राजाराम ही दोन अपत्ये झाली.
6 जून 1674 या दिवशी रायगडावर झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात सोयराबाईंना पट्टराणीचा मान मिळाला. त्यावेळी सोयराबाईंखेरीज महाराजांच्या इतर तीन पत्नी हयात होत्या.
संभाजी दोन वर्षांचे असताना त्यांच्या आई सईबाई यांचा बाळंतपणानंतरच्या आजारपणात मृत्यू झाला होता.
 
पुस्तकातील उल्लेखासंदर्भात कुबेरांचं काय म्हणणं?
पुस्तकावरून झालेल्या वादावर बीबीसी न्यूज मराठीने लेखक गिरीश कुबेर यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. गिरीश कुबेर यांना पाठवलेल्या प्रश्नांवर त्यांनी हे लेखी उत्तर दिलं: "रेनेसाँ स्टेट ही सातवाहनापासून आधुनिक काळापर्यंतच्या महाराष्ट्राची 'कहाणी' आहे. असं पुस्तक छत्रपती शिवाजी आणि त्यांचे वारसदार यांच्यावरील प्रकरणाशिवाय पूर्ण झालं नसतं. मी जे काही लिहिलंय त्यासाठी जदुनाथ सरकार आणि जसवंत लाल मेहता यांच्यासारख्या अनेक मान्यवर इतिहासकारांनी लिहिलेल्या विद्वत्तापूर्ण कामांचे संदर्भ घेतले आहेत. संदर्भासाठी घेतलेल्या स्रोतांची यादी पुस्तकाच्या अखेरीस समाविष्ट करण्यात आली आहे."