रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021 (12:04 IST)

चोर समजून आदिवासी महिलांना पोलिसांची मारहाण

पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या सहा आदिवासी महिलांना चोर समजून पोलिसांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश पोलीस उपायुक्तांनी दिले आहेत. ही घटना वसईत उघडकीस आली आहे. 
 
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘जय भीम’ चित्रपटाच्या कथेची पुनरावृत्ती वाटावी अशी ही घटना घडली आहे. पोलिसांनी चार आदिवासी महिलांना चोरीच्या केवळ संशयावरून ताब्यात घेतले आणि मारहाण केली. चूक लक्षात आल्यानंतर त्यांना सोडून दिले. इतकेच नव्हे तर त्यांना ताब्यात घेतल्याची कोणतीही नोंद पोलीस दफ्तरी करण्यात आली नाही, अशी माहिती आदिवसी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिली. 
 
पालघर जिल्ह्य़ातील डहाणू तालुक्यातील कासा परिसरात राहणाऱ्या बेबी नारायण वावरे, दीपिका दिनेश वावरे, विमल माणक्या पुंजारा, सोनम सबू भोईर, सीता संताराम भोईर, तारूसुभाष डोकफोडे या सहा आदिवासी महिला वसईच्या पापडी तलाव, कोळीवाडा या ठिकाणी राहून मोलमजुरीचे काम करतात. या महिला शुक्रवारी पापडी येथे बाजारात गेल्या असताना काही नागरिकांनी त्या चोरी करण्यासाठी आल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्या महिलांना चौकीत नेले आणि त्यांना लाठीने मारहाण करून पुन्हा बाजारात दिसू नका, अशी धमकी दिली. 
 
या महिलांनी या संदर्भात आदिवासी संघटनांना माहिती दिली. संबंधित पोलिसांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी श्रमजीवी संघटना आणि लालबावटा संघटनेने केली आहे.  याप्रकरणी २५ नोव्हेंबरला वसई पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा आदिवासी कार्यकर्ते कॉम्रेड शेरू वाघ यांनी दिला.